Breaking News

मांडूळ विकण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक

पनवेल : बातमीदार

दुतोंडी असलेला मांडूळ हा दुर्मिळ जातीचा साप घरामध्ये ठेवल्यास ऐश्वर्य मिळत असल्याच्या भूलथापा मारून मांडुळाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पनवेलमधील एसटी आगाराजवळून रविवारी रात्री अटक केली. प्रसाद जाधव (20) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेला सुमारे 50 लाख रुपये किमतीचा एक मांडूळ साप जप्त केला. पोलिसांनी हा साप वन अधिकार्‍यांच्या ताब्यात दिला आहे. एक तरुण मांडुळाची विक्री करण्यासाठी पनवेल एसटी आगाराजवळ येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनानुसार रविवारी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश माने व त्यांच्या पथकाने वन अधिकार्‍यांसह पनवेल एसटी स्टॅण्डजवळ सापळा लावला. या वेळी त्या ठिकाणी संशयास्पदरीत्या वावरणार्‍या प्रसाद जाधव याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्याजवळच्या बॅगेची तपासणी केली. त्यात मांडूळ आढळून आला. त्यानंतर तरुणाची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने हा साप 50 लाख रुपयांमध्ये विकण्यासाठी आणल्याची कबुली दिली. त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथकाने प्रसाद जाधव याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह वन्य प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. प्रसाद जाधव याने दुर्मिळ जातीचा मांडूळ साप कुठून आणला, याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply