Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सपत्नीक घेतली कोरोना लस

पनवेल ः रामप्रहर वृत्त
 माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 5) खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात कोविड-19 अर्थात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
देशात 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सपत्नीक कोरोना लसीचा पहिला डोस खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात घेतला, तसेच ही कोरोना लस सुरक्षित असल्याने घाबरण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी या वेळी दिली.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, कोरोना वैश्विक महामारीने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने आपल्या देशातील जनतेला विविध योजनांच्या माध्यमातून आधार देण्यात येत आहे. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शक  सूचनेनुसार आपले डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांनी ज्या जलदगतीने काम केले, ते कार्य कौतुकास्पदच आहे. मी आणि माझ्या पत्नीने आज कोविड लस घेतली आणि ही लस घेताना अजिबात भीती वाटत नसून कोणताही त्रास झाला नाही.
लसीकरणासाठी रुग्णालयात उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकाला शिस्तीने लस दिली जाते. लस दिल्यानंतर अर्धा तास लसीकरण केंद्रावरच थांबवून चहापाणी दिला जातो. कर्तव्याने व आपुलकीने ही लस दिली जाते. त्यामुळे आपण रुग्णालयात नाही, तर घरीच लस घेत आहोत असे वाटते, असेही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित करीत 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा आहे, असे आवर्जून नमूद केले.
तसेच ही लस दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर लसीकरणासाठी पात्र असलेल्यांनी ही लस घेऊन आपला भारत देश कोरोनामुक्त करण्यासाठी सहभाग घ्यावा, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply