Breaking News

पीओपी मूर्तिबंदी पुढे ढकला; पेणच्या मूर्तिकारांचे पर्यावरणमंत्र्यांना साकडे

पेण ः प्रतिनिधी

केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने आगामी गणेशोत्सवासाठी पीओपीच्या मूर्तींवर घातलेली बंदी आणि इतर अनेक निर्बंधांमुळे मुंबईसह राज्यातील अनेक मूर्तिकारांना फटका बसण्याची शक्यता आहे. पेण येथील मूर्तिकारांनाही या निर्णयाची झळ बसणार असून या निर्णयामुळे पेणमधील मूर्तिकार रस्त्यावर येण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे पेण येथील श्री गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळाने याप्रश्नी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना साकडे घातले असून या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून करावी, अशी मागणी केली आहे.

उत्सव कालावधीनंतर होणारे प्रदूषण लक्षात घेता गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू असलेली याचिका नुकतीच निकाली काढण्यात आली. या याचिकेच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळातर्फे उत्सव कालावधीसाठी तयार करण्यात येणार्‍या मूर्तींची निर्मिती आणि विसर्जनाकरिता सुधारित मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. या नियमावलीनुसार केंद्राने पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातली आहे, तर रंगकामासाठी वापरण्यात येणार्‍या ऑइल पेंट्स आणि इतर रंगांवरदेखील निर्बंध घातले आहेत. या निर्णयामुळे गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असणार्‍या मूर्तिकारांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या ठिकाणी मे महिन्यातच मूर्तींचे काम सुरू करण्यात येते. त्यानुसार अनेकांनी कर्ज काढून मूर्तिकाम सुरू केले आहे. लाखोंच्या संख्येत मूर्ती सध्या ग्राहकांपर्यंत जाण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे आजघडीला त्यांच्यात बदल करणे शक्य नसल्याने या मूर्तिकारांनी थेट दिल्ली दरबारी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना निवेदन पाठवले आहे.

श्री गणेश मूर्तिकार आणि कल्याणकारी मंडळाचे श्रीकांत देवधर म्हणाले की, कोरोनामुळे ग्राहकांपर्यंत गणेशमूर्ती कशा पोहचवायच्या हा आमच्यासमोर प्रश्न आहे. अशा वेळी केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने जाहीर केलेल्या नियमावलीमुळे आमच्यासमोर दुहेरी संकट ओढावले आहे. या सूचनांचा आम्हाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे यंदाच्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार्‍या गणेशोत्सवसाठी या नियमांची अंमलबजावणी करू नये. महत्त्वाचे म्हणजे या नियमांची अमंलबजावणी करताना मूर्तिकारांची मते विचारात घेणे गरजेचे आहे. त्यानुसार आम्ही केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी पत्रव्यवहार केला असून त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply