Breaking News

अनधिकृत जाहिरातबाजीप्रकरणी ग्रेट भारत सर्कसवर गुन्हा दाखल

पनवेल : प्रतिनिधी

मोठा खांदा येथील मैदानावर आलेल्या ग्रेट भारत सर्कसवर मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यान्वये कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृत जाहिरातबाजी केली म्हणून पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातर्फे याबाबत तक्रार देण्यात आली होती.

लोकसभा निवडणूक, पावसाळा व लगेच विधानसभा निवडणूक यामध्ये पनवेल महापालिकेचे बहुतांश कर्मचारी गुंतल्याचा काही लोकांनी गैरफायदा घेत अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे केली, तसेच अनधिकृत जाहिराती करण्याचा सपाटाच लावला होता. निवडणूक निकालानंतर लगेच आलेल्या दिवाळीच्या सुटीमुळे महापालिकेला प्रभावीपणे कारवाई करणे शक्य होत नव्हते. आता सुट्या संपल्यावर आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी शहरात अनधिकृत जाहिराती व अतिक्रमणांवर सोमवारपासून पुन्हा कारवाईचा आसूड ओढला आहे.

महापालिकेच्या पथकाने मंगळवारी खांदा कॉलनीत ठिकठिकाणी कारवाई करून पदपथ अतिक्रमणमुक्त केले. प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे व दशरथ भंडारी यांनी यात सहभाग घेतला. अतिक्रमण शुल्क 35 हजार 500 रोख व दोन हजार रुपये चेकने वसूल करण्यात आले. या वेळी मोठा खांदा येथील मैदानावरील ग्रेट भारत सर्कसवर अनधिकृत जाहिरातबाजी केली म्हणून कामोठे पोलीस ठाण्यात मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यांतर्गत परवाना विभाग प्रमुख सदाशिव कवठे यांनी तक्रार दिली. सर्कस आयोजकांनी परवानगी न घेता शहरात 342 पोस्टर्स लावले होते. त्यामुळे महापालिका कायद्याचे कलम 244 व 245, तसेच मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995चे कलम 3नुसार ग्रेट भारत सर्कसचे राधामोहन पिल्ले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यासंदर्भात सर्कसचे राधामोहन पिल्ले यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ती देण्यास नकार दिला. 

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply