Breaking News

रेल्वे स्टेशनवरून कुली हद्दपार

’सारी दुनिया का बोझ हम उठाते है. लोग आते है, लोग जाते है, हम यही पे खडे रह जाते है… कुली चित्रपटात लाल डगला आणि हाताला बिल्ला लावून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी या गाण्यामुळे रेल्वे स्टेशनवरील या कुलीला प्रतिष्ठा मिळवून दिली, पण आज रेल्वे स्टेशनवरील पायाभूत सुविधा आणि व्हीलवाल्या बॅगमुळे प्रवासी स्वावलंबी झाले आहेत. त्यामुळे मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरून कुली हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत.

लाल डगला आणि हाताला बिल्ला लावलेला कुली हे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर हमखास दिसणारे दृश्य. त्यांची लगबग सुरू झाली की  गाडी येणार याची सूचना प्रवाशांना मिळत असते. गाडी फलाटावर येताच कुली लहान मुले आणि सामान असलेले किंवा वृद्ध प्रवासी कोठे आहेत हे पाहून तिकडे धाव घेणार. त्यांचे सामान टॅक्सी किंवा रिक्षापर्यंत नेणार. कुली फक्त पुरुष असतात अशा भ्रमात राहू नका. मंजुदेवी ही पहिली महिला कुली राजस्थानच्या जयपूरला स्टेशनला काम करीत होती. आपल्या पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तिने पतीचा व्यवसाय करण्यासाठी अधिकार्‍यांकडे परवाना मागितला. सुरुवातीला विरोध झाला, पण नंतर तिला परवान दिला. कुली हा रेल्वेचा कामगार नसून त्याला सेवा देऊन कमाई करण्यासाठी हा परवाना दिला जातो, पण आज हे दृश्य दुर्मीळ होत चालले आहे. कारण रेल्वे अधिकारी नवीन परवाने देत नाहीत. जे जुने परवानाधारक आहेत त्यांची संख्या अत्यंत थोडी असून ते आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसवर काही वर्षांपूर्वी एका अनधिकृत कुलीने रात्री उतरलेल्या एका तरुणीवर बलात्कार केल्याने आता अनधिकृत कुलींना स्टेशनच्या फलाटावर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

आज मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, बांद्रा, कुर्ला आणि पनवेल या महत्त्वाच्या स्टेशनवर कुलींची संख्या कमी आहे. जे आता आहेत ते पुढील दोन-तीन वर्षांत निवृत्त होतील. त्यामुळे प्रवाशांना स्टेशनवर कुली उपलब्ध होत नसल्याने आपले सामान स्व:तच घेऊन जावे लागते. या वेळी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात. पनवेलसारख्या ठिकाणी एकच अधिकृत कुली आहे. या स्टेशनवरून रोज लाखो प्रवासी येतात-जातात. त्यांना आपल्या बॅगांवर पिशव्या त्यावर लहान मुले अशी कसरत करीत अरुंद आणि धोकादायक पुलावरून गाडी पकडायला जावे लागते. अशा वेळी एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, याचा खुलासा रेल्वेचे अधिकारी करीत नाहीत. 

पनवेलमध्ये 25-30 जण स्टेशनबाहेर कुलीचे काम करतात, पण ते प्रवाशांचे सामान घेऊन फलाटापर्यंत येऊ शकत नाहीत. आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. या लोकांकडून वर्तणुकीचा पोलीस दाखला घेऊन त्यांच्याकडून फी घेऊन परवाना दिल्यास त्यांनाही रोजगार मिळेल. रेल्वेलाही महसूल मिळेल आणि प्रवाशांचीही सोय होईल, पण रेल्वेचे अधिकारी याला तयार नसल्याने आता फलाटावरील लाल डगला आणि हाताला बिल्ला लावलेला कुली हद्दपार होणार यात शंका नाही.

-नितीन देशमुख

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply