महाड : प्रतिनिधी
अतिवृष्टी व वादळी पावसामुळे मागील दोन वर्षांमध्ये महाड तालुक्यामधील 35 गावांतील ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या ग्रामस्थांना आता सरकारने मदतीचा हात दिला आहे. तालुक्यातील तब्बल 425 आपद्ग्रस्तांना सुमारे
साडेतेरा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
महाड तालुक्याला नैसर्गिक आपत्तीचा इतिहास आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने शेतकर्यांच्या घराचे, गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. मागील दोन वर्षांमध्ये अवेळी झालेल्या वादळी पावसाने तसेच जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामस्थांच्या घराचे व गोठ्यांचे लहान मोठ्या स्वरूपात नुकसान झाले होते. अवेळी वादळी पावसाने तर अनेकांच्या घरांचे छप्पर उडून गेले होते. या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाकडून वेळेत करण्यात आले होते, परंतु नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यास दिरंगाई होत होती. यावर महाड महसूल विभागाने लक्ष केंद्रित करून ग्रामस्थांना
नुकसानभरपाई मिळवून दिली आहे.
महाड तालुक्यातील पाचाड गावात 133, तर वाकी बुद्रुक गावात 111 ग्रामस्थांचे वादळी पावसाने नुकसान झाले होते. याशिवाय तालुक्यातील कुसगाव, शेल कांबळे तर्फे महाड, बिरवाडी, पारवाडीस किंजळोली, मांडले, गांधारपाले, वलंग, वाळसुरे, रेवतळे, नांदगाव खुर्द, कोंडीवते, कोतूर्डे रावढळ, वामने, बेबलघर, तेलंगे मोहल्ला, वाघोली, चापगाव, वरंडोली वाळण खुर्द, रायगडवाडी, पुनाडे तर्फे नाते अशा अनेक गावांना वादळी पावसाचा तडाका बसला होता. या गावांतील नुकसान झालेल्या घरांसाठी व गोठ्यासाठी
नुकसानभरपाई देण्यात आली असल्याचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी सांगितले.
-मागील दोन वर्षांमध्ये वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या महाड तालुक्यामधील 35 गावांतील सुमारे 425 आपद्ग्रस्तांना शासनाकडून सुमारे साडेतेरा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. -प्रदीप कुडळ, नायब तहसीलदार, महाड