आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा फेज 1ला जोडणार्या सबवेमध्ये साचणार्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करून तो लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, तळोजा फेज 1ला जोडण्यासाठी सबवे बनवण्यात आला असून, पावसाळ्यात या सबवेमध्ये गुडघाभर पाणी साचत आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे गाड्यांना ये-जा करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
सबवेला पर्याय म्हणून कच्चा रस्ता तयार करण्यात आलेला आहे, परंतु पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाला आहे व मोठे मोठे दगड वर आले आहेत. या दगड व चिखलाने गाड्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात स्थानिकांनी पत्रव्यवहार केला असून, याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तळोजा फेज 1ला जोडणार्या सबवेमध्ये साचणार्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करून तो लवकरात
लवकर सुरू करावा व यासाठी वेळ लागत असेल तर बांधण्यात आलेला कच्चा रस्ता दुरूस्त करण्यात यावा, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे. या संदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनीही सिडकोचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.