Breaking News

खांदा वसाहतीतील फेरीवाल्यांना पर्यायी जागा

सेक्टर 13मध्ये भरणार रोजबाजार; महापालिका प्रशासनाची सकारात्मक भूमिका

पनवेल : रामप्रहर वृत्त

खांदा वसाहतीत ज्या ठिकाणी फेरीवाले व्यवसाय करीत होते त्या भूखंडावर बस टर्मिनल आणि वर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्याचे काम लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे हा भूखंड मोकळा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर येथील फेरीवाल्यांना पर्यायी जागा द्या, अशी मागणी भाजप नगरसेविका सीता पाटील यांनी केली होती. त्यानुसार  सेक्टर 13मध्ये जागा देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी रोजबाजार भरविण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेने सकारात्मक भूमिका घेतली आहे. पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सिडको वसाहतीत रस्त्यावर व्यवसाय करणार्‍या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन होणे क्रमप्राप्त आहे, परंतु अनेक तांत्रिक अडचणींमुळे सिडकोने संबंधितांचे पुनर्वसन केले नाही. दरम्यान, खांदा वसाहतीतील फेरीवाले सेक्टर 8 येथील भूखंडाच्या कडेला व्यवसाय करीत होते, मात्र हा भूखंड बस टर्मिनलसाठी राखीव आहे, तसेच खाली टर्मिनल आणि वर इमारती असा प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियाही पूर्ण झाल्या आहेत. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी हा भूखंड मोकळा करण्यात आला. संबंधित फेरीवाल्यांच्या प्रश्नाबाबत याअगोदरच नगरसेविका सीता पाटील यांनी पाठपुरावा केला होता, तसेच त्यांनी यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना साकडे घातले. या सर्व गोष्टींचा विचार करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी तीन महिन्यांपूर्वी खांदा वसाहतीत जाऊन फेरीवाल्यांना पर्यायी जागा, तसेच त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून मोकळ्या भूखंडाची पाहणी केली होती. त्या संदर्भातील सूचना त्यांनी सिडको आणि महापालिकेला दिल्या होत्या. त्याचबरोबर सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, सीता पाटील यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन हातावर पोट असणार्‍या फेरीवाल्यांना पर्यायी जागा देण्याची मागणी केली होती. याबाबत दोन दिवसांत तीन बैठकासुद्धा घेण्यात आल्या. त्यानुसार उपायुक्तांनी खांदा वसाहतीत जाऊन पाहणीसुद्धा केली.

सेक्टर 13मधील जागेचा पर्याय

खांदा वसाहतीत सेक्टर 13मध्ये मिनी मार्केटकरिता भूखंड राखीव आहे. या ठिकाणी टपर्‍या टाकण्यात आल्या आहेत. त्यापैकी बहुतांशी बंद अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी खांदा वसाहतीतील फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याकरिता पर्याय सुचविण्यात आला आहे.

रोजबाजार विकसित करणार

या परिसराची साफसफाई करून त्या ठिकाणी ओटे बांधण्याचा प्रस्ताव आहे, तसेच वर शेड टाकण्यात येणार आहे. वीज आणि पाण्याची सोय महापालिकेकडून केली जाणार आहे. याकरिता प्रशासनाकडून नाममात्र शुल्क घेतले जाणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply