Breaking News

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना : जिल्ह्यातून 14 हजार 277 कामगाराचा सहभाग

अलिबाग : केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र असून त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नाव नोंदणी करण्यात येत आहे. या योजनेचा प्रारंभ मंगळवारी (दि. 5) देशपातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी रायगड जिल्ह्यातील 14 हजार 277 कामगारांनी या योजनेत सहभाग घेतला असून, राज्यात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे, असेही या वेळी जाहीर करण्यात आले.

सदर उद्घाटन समारंभास जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रकाश गजऋषी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचे गिरीश डेकाटे, भारतीय मजदूर संघाचे संघटन मंत्री मोहन पवार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचे रुद्र प्रसाद, सहाय्यक संचालक ओमप्रकाश ठाकूर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड आदी उपस्थित होते. या वेळी प्रकल्प संचालक प्रकाश गजऋषी यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की, या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातून 14 हजार 277 कामगारांनी सहभाग घेतला आहे. राज्यात सर्वाधिक सहभाग नोंदणी सातारा जिल्ह्यात असून त्या खालोखाल रायगड जिल्ह्यात आहे. ही नोंदणी अजूनही सुरूच असून रायगड जिल्हा आणखी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वाधिक सहभाग नोंदविणार्‍या उत्कृष्ट अधिकारी व कर्मचार्‍यांना या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अलिबाग येथील विस्तार अधिकारी शर्मिला पाटील यांचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला, तसेच लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी, तसेच अन्य उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून अधिकाधिक कामगारांनी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या देशपातळीवरील मुख्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले. या वेळी कामगार व कामगार क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.

अशी आहे योजना

ज्या कामगारांना पेन्शन योजना लागू नसते अथवा खाजगी पेन्शन योजनेमध्ये देखील जे सहभागी होऊ शकत नाहीत अशा स्वरूपाच्या कामगारांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत लाभदायक आहे.

असंघटीत व शासकीय यंत्रणांसोबत काम करणारे प्रवर्गांचाही सहभाग

या योजनेचा लाभ घरात काम करणारे कामगार, दुकानातील कामगार, ड्रायव्हर, प्लंबर, मिड डे मील वर्कर, रिक्षा चालवणारे, वीटभट्टीवर काम करणारे कामगार, कारखान्यातील कामगार, शेत मजूर इ. असंघटित क्षेत्रातील कामगारांसोबत शासकीय यंत्रणांच्या सोबत काम करणारे काही प्रवर्ग यात अंगणवाडी सेविकांचे मदतनीस, ग्रामपंचायतीकडील कंत्राटी कामगार महिला, बचत गटाच्या सदस्य असलेल्या महिला इ. देखील लाभ घेऊ शकतात.

नाव नोंदणीची कार्यपद्धती

या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी संबंधित व्यक्ती कोणत्याही ङखउ ऑफिसमध्ये, विमा कर्मचारी राज्य विमा आयोगाच्या ऑफिसमध्ये, तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकते. ग्रामपंचायतस्तरावर नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी संबंधित व्यक्तींनी आधार कार्ड व बँक पासबुकाची झेरॉक्स सोबत न्यावी.

निकष

त्यासाठी त्यांचे महिन्याचे उत्पन्न 15 हजार रुपयापेक्षा कमी असावे, तसेच त्यांचा वयोगट 18 ते 40 यामध्ये असावा. वयोपरत्वे लाभार्थ्यांना वेगळा हप्ता असून लाभार्थी जितका हप्ता भरणार आहेत तेवढाच हप्ता केंद्र सरकारही देणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यू झाला तरीही त्याच्या कुटुंबीयांना 50 टक्के फॅमिली पेन्शन चालू राहील.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply