Breaking News

नागोठणेतील शिवमंदिरे गजबजली

नागोठणे : महाशिवरात्रीनिमित्त नागोठणे शहरातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या अखत्यारीतील पुरातन रामेश्वर मंदिर, ब्राह्मण समाजाचे नवीन रामेश्वर मंदिर, तसेच नागोठणे-रोहे मार्गावरील भिसे खिंडीतील शंकर मंदिर सोमवारी (दि. 4) दिवसभर भाविकांनी फुलून गेले होते. कायस्थ प्रभू समाजाचे रामेश्वर मंदिरात जोगळेकर गुरुजींच्या पौराहित्याखाली सकाळी अजय अधिकारी यांच्या हस्ते शंकराच्या पिंडीवर अभिषेक, तसेच पूजा करण्यात आली. तर दुपारी 12 वाजता शंकर देशपांडे यांच्या हस्ते लघुरुद्र करण्यात आले. सायंकाळी शंकराची पालखी काढण्यात आली. हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सीकेपी समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले. ब्राह्मण समाजाच्या मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. यानिमित्ताने कीर्तन ठेवण्यात आले होते.

पेण तालुक्यात महाशिवरात्री उत्साहात साजरी

पेण : तालुक्यात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पेणचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर, पाटणेश्वर मंदिर, गौतमेश्वर मंदिर, गोटेश्वर मंदिर, वरसईचे स्वयंभू वैजनाथ मंदिर, माणिकगडावरील शिवकालीन माणकेश्वर मंदिर, महलमिरा डोंगरावरील जांभा दगडातील स्वयंभू गौतमेश्वर मंदिर, गोटेश्वर व्याघे्रश्वर मंदिर, वडखळचे श्री क्षेत्रेश्वर, भोगावती नदीकाठचे विश्वेश्वर मंदिर, कोप्रोली येथील सिद्धेश्वर भवानी मंदिर आदी अनेक शिवमंदिरांमध्ये शिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक-भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. प्रत्येक शिवालयांमध्ये अभिषेक, महाआरती, शिवसहस्त्र नामावली, शिवस्तुती व शिवलीलामृत पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पेणपासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्‍या पाटणेश्वर गावातील स्वयंभू प्राचीन शिवमंदिरामध्ये हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यानिमित्त पाटणेश्वर येथे मोठी यात्रा भरली होती.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply