अलिबाग : मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन झोन चार कबड्डी स्पर्धेत अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. ‘जेएसएम’च्या संघाने 13 वर्षांनंतर विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
पनवेल येथे झालेल्या या स्पर्धेत रायगड, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या 48 महाविद्यालयांतील संघांनी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या लढतीत जेएसएम कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेत्या संघात आनंद थळे (कर्णधार), शुभम मोकल (उपकर्णधार), करण म्हात्रे, विनय पाटील, सशांत मगर, आदेश पाटील, इस्त्राइल वासकर, साहिल राऊत, अखिल ठाकूर, वृणाल सुतार, विप्रय सावंत, मंथन सुर्वे, रोहन वर्तक यांचा समावेश होता. विजयी संघाचे व्यवस्थापक व प्रशिक्षक म्हणून क्रीडा विभागप्रमुख प्रा. एन. ए. बाबर यांनी काम पाहिले व मोलाचे मार्गदर्शन केले. या विजयी संघाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष अॅड. गौतम पाटील, कार्यवाह अजित शाह, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले.