
खोपोली : प्रतिनिधी
रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादल्यावर पीएमसी बँकेत खळबळ उडाली आहे. खातेदारांनाही धक्का बसला आहे. पीएमसी बँकेचे खोपोलीत हजारो खातेदार आहेत. आपल्या खात्यातील रक्कम व ठेवींचे काय, याबाबत ठेवीदार चिंतेत सापडले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी दुसर्या दिवशी बुधवारीही सकाळपासून पीएमसी बँकेच्या खोपोली शाखेत व शाखेबाहेर खातेदारांनी गर्दी केली होती. पीएमसी बँकेच्या व्यवहारांवर मंगळवारी रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध घालण्यात आले. ते वृत्त समजताच पीएमसी बँकेच्या खोपोलीतील खातेदारांनी बँक शाखेत गर्दी करण्यास सुरुवात केली होती. बँकेत असलेली आमची रक्कम कधी मिळणार, अशी विचारणा ठेवीदार करीत होते. बुधवारी दुसर्या दिवशी सकाळपासूनच खोपोली शाखेत खातेदारांनी गर्दी केली होती. आमचे सर्व पैसे द्या, त्याशिवाय तुमची सुटका केली जाणार नाही, असा इशारा ते देत होते, मात्र नियमानुसार फक्त एकच हजार रुपये काढता येतील, असे सांगून बँक कर्मचारी ‘थोडा संयम ठेवा, सर्व सुरळीत होईल,‘ अशी ग्राहकांची समजूत घालत होते. दरम्यान, कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सकाळपासूनच बँक परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.