मुंबई : प्रतिनिधी
सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेल्या औषधामुळे त्याला क्रिकेटपासून आठ महिने दूर राहण्याची शिक्षा झाली होती. ’माझी दुसरी इनिंग ही 2.0 असेल’ अशी ग्वाही पृथ्वी शॉने दिली. 20व्या जन्मदिनी त्याने सराव करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आणि पुनरागमनासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.
इंदूरमध्ये सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या वेळी पृथ्वी शॉने जी सॅम्पल पुरवली, त्यात प्रतिबंधित औषधाचा घटक आढळला होता. डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पृथ्वीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कारवाई केली, मात्र आपण खोकल्यासाठी अनावधानाने हे औषध घेतल्याचे पृथ्वीने सांगितले होते.
सय्यद मुश्ताक अली चषकातूनच संधी?
सर्वांत तरुण वयात शतक पूर्ण करण्यासह पृथ्वी शॉने अनेक विक्रम नावावर केले, मात्र यानंतर काहीच दिवसांत त्याच्यावर बंदीची कारवाई झाल्यामुळे त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागले. आता सय्यद मुश्ताक अली चषकातूनच संधी मिळाल्यास पृथ्वी शॉला पुन्हा एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावण्याची संधी मिळणार आहे.
सय्यद मुश्ताक अली चषकासाठी पृथ्वी शॉच्या निवडीबाबत चर्चा होऊ शकते. पृथ्वी 16 नोव्हेंबरपासून खेळण्यासाठी मोकळा आहे. त्याच्या पुनरागमनाबाबत मी आश्वस्त करू शकत नाही, मात्र त्याच्या निवडीवर चर्चा नक्कीच होईल.
-मिलिंद रेगे, अध्यक्ष
मुंबई निवड समिती