Breaking News

‘ये है मुंबई मेरी जान’

राज्यपालांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन; मान्यवरांची उपस्थिती

कर्जत ः प्रतिनिधी

मुंबईबरोबरचे आपले नाते जिव्हाळ्याने जपलेल्या स्वर्गीय सरदार कुलवंतसिंग कोहली यांनी कथन केलेल्या आणि प्रा. नितीन आरेकर यांनी शब्दांकित केलेल्या तसेच राजहंस प्रकाशनाच्या ’ये है मुंबई मेरी जान’ पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईच्या ताज महल हॉटेलमधील क्रिस्टल सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा, मोहिंदर कौर कोहली, राजहंस प्रकाशनचे सदानंद बोरसे, गिरीश कुबेर, लेखक प्रा. नितीन आरेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी पुस्तकाचे लेखक प्रा. आरेकर यांचा सन्मान करताना राज्यपालांनी राजशिष्टाचार आड न ठेवता स्वतः उठून आरेकरांजवळ जाऊन त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. प्रकाशक बोरसे यांनाही सन्मानित करण्यात आले. काही लोक आपली छाप सोडून जातात. त्यापैकी एक कुलवंतसिंग होते. प्रतिकूल परिस्थितीत मुंबईत आलेल्या कोहली कुटुंबाने स्वतःचे स्थान निर्माण केले आणि मुंबईचा अविभाज्य भाग झाले. मुंबईत मोठे झालेले अनेक जण आहेत, मात्र कुलवंतसिंग यांनी स्वतःबरोबर अनेकांच्या स्वप्नांना बळ दिले आणि याची जाण ठेवून मुंबईकरांनी त्यांना प्रेम दिले, अशा भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्या. कोहली आणि माझे ऋणानुबंध 1976पासून आहेत. चंदेरी दुनियेमागील वास्तव कोहली यांनी जवळून पाहिले. अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. झगमगाटापलीकडे असलेले अनेक कलाकारांचे, दिग्गजांचे आयुष्य कोहली यांनी ’ये है मुंबई मेरी जान’च्या माध्यमातून मांडले.  हे पुस्तक क्षणिक आनंदासाठी नाही, तर जीवनमूल्य शिकवणारे आहे. ती मूल्ये कोहलींनी आत्मसात केली होती. हे पुस्तक हिंदी व इंग्रजी भाषेत केल्यास अनेकांना त्याचा लाभ घेता येईल. अशी आणखी माणसे परमेश्वराने घडवावीत, असे सुशीलकुमार शिंदे यांनी नमूद केले. अमरदीपसिंग कोहली आणि गुरुबक्षसिंग कोहली यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. समीरा गुजर-जोशी यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत केले.याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, राज्याचे निवृत्त मुख्य सचिव उत्तम खोब्रागडे, माजी आमदार सुरेश लाड, मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, डॉ. सुनील पाटील, पद्मश्री मनोज जोशी, सुभाष आठल्ये, प्राचार्य डॉ. पद्मा देशमुख, विजय कलंत्री, चारणजीत कौर, अजित केरकर, दिलीप माजगावकर, गणेश वैद्य, किशोर कुलकर्णी, राजाभाऊ कोठारी, प्रवीण गांगल, पंकज ओसवाल, प्रभाकर करंजकर, दिलीप गडकरी, रंजन दातार, राहुल कुलकर्णी आदींसह कोहली परिवार उपस्थित होता.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply