कळंबोली : बातमीदार
कळंबोली सर्कलच्या बाजूला असलेल्या कळंबोली वाहतूक पोलीस कार्यालयाच्या बाजूलाच जुगाराचा अड्डा रोज सकाळी 8 वाजल्यापासून मांडला जात आहे. या जुगार अड्ड्यावर माथाडी कामगार, तसेच अन्य कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. प्रथमदर्शनी जुगार खेळताना जिंकण्याचे आमिष दाखवून नंतर कंगाल करण्याचा अनोखा प्रकार केला जात आहे, मात्र हा सर्व बेकायदा प्रकार कायद्याच्या रक्षकाच्या समक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कळंबोली सर्कलमधून दररोज हजारो कामगार ये-जा करीत असतात. याचाच गैरफायदा घेऊन येथील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाजवळच जुगार अड्डा मांडला जात आहे.
तीन चौकोनी कार्डवर हा जुगार खेळला जात आहे. या तीन कार्डापैकी एकावर एक आकडा लिहिलेला आहे. तीन कार्ड हातचलाखीने फिरवून जो कोणी एक नंबर लहिलेले कार्ड ओळखेल त्याला जुगारात लावण्यात आलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम दिली जात आहे, तसेच सातशे रुपये जुगारात लावले व ते जिंकले तर एक मोबाईलही भेट म्हणून देण्याच आमिष दाखवलं जात आहे. जुगार खेळायला जर कोणी जाळ्यात सापडला, तर त्याला प्रथम जिंकून दिले जाते. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही जुगार चालवणार्याची माणसे आजूबाजूला उभी असतात. त्यामुळे एखादे सावज गळाला लागले, तर त्याच्याकडील सर्व पैसे संपेपर्यंत जुगार खेळायला जबरदस्ती केली जाते. जर कोणी पैसे जिंकून जात असेल, तर त्याला मारझोडही केली जाते, मात्र भीतीपोटी व लाजेखातर कोणी पोलिसात तक्रार देण्यास तयार होत नाही. काही महिन्यांपूर्वीही याच सर्कलमध्ये स्टायगरचा जुगार खेळला जात होता. आता तर वाहतूक पोलिसांच्या समक्ष राजरोसपणे जुगाराचा बेकायदा खेळ मांडला जात आहे. या खेळाला सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने बळी पडत आहेत. पोलिसांनी जुगार अड्डा चालवणार्याच्या मुसक्या आळवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.