Breaking News

विमानतळ निर्मितीला वेग

धावपट्टीच्या कामाला येत्या 15 दिवसांत सुरुवात

उरण ः रामप्रहर वृत्त

गेली अनेक वर्षे या ना त्या कारणास्तव लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील धावपट्टीच्या कामाला येत्या 15 दिवसांत सुरुवात होणार असल्याचे सिडको सूत्रांनी सांगितले. या कामाला आता अधिक विलंब लागू नये, अशी सूचना सिडकोने विमानतळ बांधकाम कंपनीला दिली आहे. जीव्हीके कंपनीला नवी मुंबई विमानतळ उभारणीचे काम मिळाले असून, त्यांनी एल अ‍ॅण्ड टी कंपनीला धावपट्टी, टर्मिनल्स, टॅक्सी वे यांची कामे दिली आहेत. विमानतळासाठी एकूण 2268 हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली. त्यातील 1160 हेक्टर जमिनीवर प्रत्यक्षात टर्मिनल्स व धावपट्ट्या उभारल्या जाणार आहेत. दक्षिण व उत्तर बाजूस दोन धावपट्ट्या उभारल्या जाणार असून, देशातील पहिले ‘ग्रीन फिल्ड’ विमानतळ असे या विमानतळाचे वैशिष्ट्य असेल. विमान प्राधिकरणाने दक्षिणेस बांधण्यात येणार्‍या धावपट्टीच्या आड येणार्‍या आणखी एका टेकडीची उंची कमी करण्याची सूचना चार महिन्यांपूर्वी केली आहे. हे काम वाढल्याने पुढील वर्षी विमानतळावरून होणारे पहिले उड्डाण काही महिने लांबणीवर

गेले आहे. विमानतळ प्रकल्पात जमिनीच्या बदल्यात सिडकोचा 26 टक्के हिस्सा असून, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा 74 टक्के भाग आहे. सिडकोने हा प्रकल्प लवकर उभारण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसांत दक्षिण नवी मुंबईकडील बाजूस होणार्‍या धावपट्टीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, उत्तर बाजूस उभारण्यात येणार्‍या धावपट्टीची इतक्यात आवश्यकता नसल्याने ही धावपट्टी नंतर बांधली जाणार आहे.

स्थलांतराचा मार्ग मोकळा

धावपट्टीसाठी आवश्यक असलेले सपाटीकरण, उलवा टेकडीची उंची कमी करणे, तसेच नदीचा प्रवाह बदलणे ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. दोन हजार कोटी रुपये खर्चाची ही कामे सिडको करून देणार असल्याची निविदा प्रक्रियेतील प्रमुख अट आहे. या विमानतळाला अडथळा ठरू पाहणार्‍या 10 गावांपैकी कोल्ही, कोपर, चिंचपाडा, वरचा ओवळा आणि वाघिवली या गावांतील प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर केले असून, काही मोजकी घरे अद्याप स्थलांतरित व्हायची बाकी आहेत. पावसाळा संपल्याने या घरांच्या स्थलांतराचा मार्गही मोकळा झाला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply