मुरूड : प्रतिनिधी
कोकण डॉक्टर असोसिएशनतर्फे रुग्ण तपासणी व मोफत औषधे देऊन पूरग्रस्त भागाला मोठा दिलासा दिला आहे. असोसिएशनने 23 जुलैपासून रुग्ण तपासणीचे कार्य सुरू ठेवले असून ते आजतागायत सुरू आहे. महाड, चिपळूण व पोलादपूर तालुक्यांमधील पूरग्रस्तांना असोसिएशनचे सर्व डॉक्टर सेवा देत आहेत. एका दिवसात दोन ते तीन गावांना भेट देऊन रुग्णांची तपासणी व मोफत औषधपुरवठा केला जात आहे. जमातुल मुस्लिम-म्हसळा व युथ फाऊंडेशन – मोरबा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने असोसिएशनला दोन क्लिनिक व्हॅन देण्यात आल्या असून, रोज सहा डॉक्टर या व्हॅनमधून पूरग्रस्त भागातील लोकांची आरोग्य तपासणी करून चांगली मोफत सेवा देत आहेत. आतापर्यंत सहा हजारपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. असोसिएशनतर्फे महिलांना विशेष सेवा देण्यात येत आहे. महिलांना आवश्यक असणार्या वस्तू व लहान मुलांसाठी दूध मोफत वाटप करण्यात येत आहे. या आरोग्य सेवाकार्यासाठी कोकण डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वसीम फोफळूणकर, सचिव निस्सार बिरवाडकर, डॉ. अब्दुलरज्जाक रहटविलकर, डॉ. नस्सीम खान, डॉ. नदीम डावरे, डॉ. फर्मान मुल्ला, डॉ. नफीस टोल, डॉ. इम्रान फकी, डॉ. वसीम पेशइमाम, डॉ. शबनम मुकादम, डॉ. आतिफ माहिमतुले, डॉ. नाझीम दादन, डॉ. साजिद टाके मोठे योगदान देत आहेत.