Breaking News

अजितदादा, आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल!; शिवसेना नेते संजय राऊतांचा इशारा

पुणे ः प्रतिनिधी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये वारंवार विसंवाद दिसून येत आहे. त्याचाच प्रत्यय रविवारी (दि. 26) पुन्हा एकदा आला. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुण्यातील भोसरी येथे शिवसेनेच्या एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून अजितदादा, आमचे ऐका, नाहीतर गडबड होईल, असा इशारा दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी संजय राऊतांनी केलेल्या विधानाचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. पालकमंत्री आपले नाहीत. राज्यात जरी सत्ता असली, तरी या भागात आपले कुणी ऐकत नाही असे म्हणतात, पण असे होता कामा नये. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. अजित पवारदेखील उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. आपण त्यांना सांगू, दादा ऐकले तर बरे होईल. नाही तर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज, अशी टिप्पणी राऊत यांनी या वेळी केली. आघाडी होईल का, नाही झाली तर काय? त्या भानगडीत कशाला पडायचे आपण? आपल्याला एकट्याने लढण्याची सवय आहे. आलात तर तुमच्याबरोबर, नाही तर तुमच्याशिवाय. कशाकरिता आपण रेंगाळत बसायचे. आपण सगळ्या जागांची तयारी केली पाहिजे. उद्या आपल्यासमोर चर्चेला बसतील. मग या घ्या, त्या घ्या. आपण सन्मानाने आघाडी करण्याचा प्रयत्न करू, पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी तडजोड आपण करणार नाही हे लक्षात घ्या. एकदा ठरले लढायचे म्हटल्यावर आपण लढू, असेदेखील राऊत यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांना सांगितले. दरम्यान, या वेळी संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणेही अजित पवारांना टोला लगावला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. कुणाची भीती बाळगायचे कारण नाही. तुम्ही जबाबदारी घ्या, काही झाले तर मला सांगा. मी येतो इथे, असे राऊत म्हणाले.

Check Also

पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित

पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या …

Leave a Reply