Breaking News

भागूबाई चांगू ठाकूर महाविद्यालयातर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांचा सत्कार

पनवेल ः प्रतिनिधी

भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात 8 नोव्हेंबर रोजी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विधी अभ्यासक्रमाची तसेच मुंबई विद्यापीठामार्फत या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या नवीन परीक्षा पध्दतीची माहिती देण्याकरिता ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी न्यू लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य नारायण राजाध्यक्ष हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर आमदार प्रशांत ठाकूर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कु. पूर्णिमा पाटेकर या विद्यार्थिनीने आमदार प्रशांत ठाकूर यांचे औक्षण केले. प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी मान्यवरांचे स्वागत करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर यांचा भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयातर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विधी व्यवसाय समाजास उपयोगी ठरणारा व्यवसाय असून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन उत्कृष्ट वकील होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. या वेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नारायण राजध्यक्ष यांनी विधी अभ्यासक्रमाची व समाविष्ट असलेल्या सर्व विषयांची माहिती दिली. मुंबई विद्यापीठामार्फत या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या नवीन परीक्षा पध्दतीत 60 गुणांची लेखी परीक्षा व 40 गुणांकरिता महाविद्यालयातर्फे घेण्यात येणार्‍या इतर परीक्षांची सविस्तर माहिती दिली. वकिली व्यवसायाचे वैशिष्ट्य असलेला गुण म्हणजेच सभाधीटपणा येण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात येणार्‍या सर्व कार्यक्रमात सहभाग घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. कायदा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणार्‍या व्यवसायाच्या विविध पर्यायांची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमासाठी सहा. शिक्षिका दीपाली बाबर, प्रियांका म्हात्रे, श्रुती पोटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी अक्षता ठाकूर या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केेले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply