ठाणे ः प्रतिनिधी
ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिरात सशस्त्र दरोडा टाकणार्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शहापूर परिसर, दादरा व नगर हवेली येथून पाच दरोडेखोरांना अटक केली असून, ते ठाणे व पालघर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
गोविंद गिंभल, विनीत चिमडा, भारत वाघ, जगदीश नावतरे व प्रवीण नावतरे अशी दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख 83 हजार रुपये जप्त करण्यात आले. अद्याप या प्रकरणातील तीन दरोडेखोर फरार आहेत. रेकीनंतर त्यांनी दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली.
देवी मंदिरात 10 मे रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. सुरक्षारक्षकाला बांधून ठेवत दानपेट्या फोडून सात लाख 10 हजारांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले होते. पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत होता. जिल्ह्याबाहेरील पोलीस पथकेही तपासकामी रवाना झाली होती.