पेण : प्रतिनिधी
खोपोली जवळील साजगाव येथे सुरु झालेल्या बोंबल्या विठोबाच्या यात्रेत पेण कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी सुक्या मच्छीची दुकाने थाटली असून, या दुकानांतील पेणच्या सुक्या मच्छीला वाढती मागणी आहे.
‘धाकटीपंढरी’ म्हणून ओळख असलेल्या विठोबा मंदिर परिसरात कार्तिकी एकादशीपासून यात्रेला सुरुवात झाली असून, ती पंधरा दिवस चालणार आहे. या जत्रेत सुकीमच्छीचा बाजार फार मोठ्या प्रमाणात भरला असून, या बाजारात पेण, अलिबाग, उरण तालुक्यातील कोळी बांधव सुकी व खारी मच्छी विक्रीसाठी घेवून आले आहेत.
पूर्वी या साजगावच्या जत्रेत घाटमाथ्यावरील व्यापारी बैल, घोडा, गाई, घोंगड्या, बोकड व अन्य वस्तू विक्री करण्यासाठी घेउन येत असत, मात्र आता त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, कोकणातील खारी व सुकी मच्छी घाटमाथ्यावरील लोकांना आवडत असल्यामुळे ते सुकी मच्छी खरेदीसाठी साजगावच्या जत्रेत हटकून येत असतात. या यात्रेत प्रामुख्याने सुक्या बोंबीलांना प्रचंड मागणी होत असल्याने साजगावच्या या यात्रेचे नाव ‘बोंबल्या विठोबाची यात्रा’ असे रूढ झाले आहे.
या यात्रेत सुक्या मच्छीची दुकाने थाटण्यासाठी पेण कोळीवाड्यातील अनेक कोळीबांधव महिनाभर अगोदरच तयारीला लागतात. महिनाभर आधीपासून ओली मच्छी कापून त्याला मीठ लावून पेट्या-पाट्यांमध्ये भरून ठेवतात, या पेट्यातील मच्छी साजगाव यात्रेत विक्रीसाठी नेतात. बांगडा, रावस, बोंबील, हलवा, वाकट्या, बगे, सुकट, जवळा, खारे सोडे अशा प्रकारची सुकी मच्छी साजगावच्या यात्रेत मिळते. साजगावच्या जत्रेत सुक्या मच्छीच्या विक्रीतून दररोज लाखोंची उलाढाल होते. रायगडसह ठाणे, मुंबई जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील लोक सुकी मच्छी खरेदीसाठी बोंबल्या विठोबाच्या यात्रेस आवर्जून येतात.