खोपोली : प्रतिनिधी
नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आवश्यक सोयी सुविधा व रुग्णालय अद्यावत होण्यासाठी आत्ता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे. नगरपालिका व संबंधित व्यवस्थेवर दबाव वाढविण्यासाठी शहरातील नागरिकांना बरोबर घेण्यात येणार असून, त्यासाठी स्वाक्षरी मोहीम ही सुरू होणार आहे.
खोपोली नगरपालिका रुग्णालयात मागील काही दिवसांपासून विविध गैरसुविधा व अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेकडे पाठपुरावा केला असता, रुग्णालयासाठी होणार्या खर्चामुळे नगरपालिका तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण पडत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सदर रुग्णालय शासनाचा आरोग्य विभाग, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ किंवा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव खोपोली नगरपालिकेकडून वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत आहे त्या स्थितीत सदर रुग्णालय नागरी सेवा म्हणून सुरू राहील असे धोरण नगरपालिका प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. अशा स्थितीत नगरपालिका रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधा निर्माण होण्यासाठी अधिकचा आर्थिक खर्च करता येणार नाही हेही नगरपालिकेकडून सांगितले जात आहे.
खोपोली नगरपालिका हद्दीत व परिसरात दीड लाखाहून अधिक लोकसंख्या, महामार्ग, एक्सप्रेस वे, लोकल सेवा व मोठी औद्योगिक वसाहत असल्याने डॉ. आंबेडकर रुग्णालयात आपत्कालीन स्थितीत उपचार घेण्यासाठी, दैनंदिन तपासणी व उपचारासाठी रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात अत्यल्प सोयी सुविधा व तांत्रिक सामुग्रीचा अभावाने रुग्णालय मेटाकुटीला आले आहे. सतत असुविधा निर्माण होऊन रुग्णालय विरोधात नागरिकांचा संताप वाढत आहे. याची दखल घेत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. नगरपालिका रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा निर्माण व्हाव्यात, एक्सरे मशीन, तपासणी लॅब पूर्णवेळ कार्यरत व्हावी, डॉक्टर व आरोग्य सेविकांची रिक्त पदे भरण्यात यावीत यासाठी आता शहरातील विविध सामाजिक संस्थांकडून स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात शहरातील विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिकांचाही सहभाग घेण्यात येणार आहे.
खोपोली परिसरात सतत आपत्कालीन स्थिती निर्माण होत असते. दीड लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात अद्यावत रुग्णालय असावे ही सर्वांची मागणी आहे. येथे दाखल होणार्या रुग्णांना सर्व आवश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात ही आमची मुख्य मागणी आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू होणार आहे.
-प्रवीण उर्फ बंडू क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते,
खोपोली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सर्व आधुनिक आरोग्य सोयीसुविधा मिळाव्यात, रुग्णालयाचा विस्तार व्हावा यासाठी कोणाचाही विरोध नाही, मात्र यासाठी लागणारा आवश्यक निधी कशा प्रकारे उपलब्ध होईल, हा मोठा प्रश्न आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. परंतु विद्यमान स्थितीत नगरपालिकेच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण ही महत्वाची बाब आहे. तरीही नागरिकांच्या हितासाठी योग्य तो धोरणात्मक निर्णय पालिकेकडून घेण्यात येईल. -सुमन औसरमल, नगराध्यक्ष