खालापूर : प्रतिनिधी
सावरोली – खारपाडा मार्गावर धामणीनजीक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला असून, चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.
खालापूर हद्दीत धामणी गावानजीक विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याचे तसेच संध्याकाळी हा भाग निर्मनुष्य असल्याचे हेरून चोरट्यानी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने एटीएम मशिन कापण्याचा प्रयत्न केला. परंतु मशिनमध्ये ठेवलेल्या रकमेपर्यंत पोहचण्यात चोरट्याला यश मिळाले नाही.अखेरीस चोरट्यानी त्याच आवस्थेत पळ काढला. एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँक व्यवस्थापकांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एटीएम मशिनमध्ये नक्की किती रक्कम होती याचा तपशील मिळाला नसून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमित सावंत करीत आहेत.