उधाणामुळे सुरुच्या बनालाही धोका
मुरूड : प्रतिनिधी
मुरुड शहराला तीन किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. मात्र पावसाळ्यातील मोठ्या भरतीमुळे धुप्रतिबंधक बंधारा फुटून मुरुड समुद्र किनार्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुरुच्या झाडांची वनेसुध्दा नष्ट होत आहेत. लाटांसोबत वाहून येत असलेल्या कचर्यामुळे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरूडच्या समुद्र किनार्याला बकाल स्वरूप येऊ लागले आहे. मात्र त्याकडे नगर परिषद किंवा स्थानिक यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे.
मुरूडमध्ये दरवर्षी दीड लाखापेक्षा अधिक पर्यटक येतात. तथापि रस्ते व किनारा सुशोभीकरण, वाहनतळ आदी मुलभुत सुविधा देण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. येथील समुद्र किनार्यावरील जिल्हा परिषद विश्रामगृह ते विश्रामबागेपर्यंतचा दगडी बांध नावापुरताच उरला असून पावसाळी लाटांच्या मार्यात सुरुची अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. मेरीटाईम बोर्डही धुप प्रतिबंधक बंधार्याकडे फारसे लक्ष देत नसल्याने मुरूडच्या किनार्याची स्थिती नाजूक झाली आहे. त्याकडे गांभिर्याने कोणीही लक्ष न दिल्यास भविष्यात हा किनारा उध्वस्त होऊन या पर्यटन स्थळाचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.
यंदाच्या पावसात मोठी भरती आल्याने समुद्र किनारी असणारा बंधारा उध्वस्त झाला आहे तर जिल्हा परिषद गेस्टहाऊस मागील दगडी बंधार्यावरून पाणी गेल्याने सुरुची असंख्य झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे समुद्र किनारा उघडा-बोडका दिसत असून या ठिकाणी लवकरात लवकर दगडी बंधारा बांधून उर्वरित सुरुंच्या झाडांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. अलिबाग प्रमाणेच मुरूड समुद्र किनारी मजबूत दगडी बंधारा बांधावा, अशी मागणी पर्यटक व स्थानिकांकडून केली जात आहे.