Breaking News

सृजनशील कवी हा समाजाला जोडणारा दुवा : परेश ठाकूर

‘कोमसाप’ नवीन पनवेल शाखेचे कविसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
सृजनशील मनाचा कवी हा समाजाला जोडणारा एक दुवा आहे, असे भावोद्गार पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 30) येथे काढले. कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या ऑनलाइन कविसंमेलनातील ‘मी पुस्तक बोलतोय’ या पाचव्या पर्वाचे उद्घाटन ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
‘कोमसाप’ नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्या संकल्पनेतून झालेल्या या उपक्रमात पुढे बोलताना परेश ठाकूर यांनी कोरोना महामारीच्या परिस्थितीत सकारात्मक दृष्टीने कार्यरत असणारी ही संवेदनशील मंडळी समाजाला सुखद, आल्हाददायक अनुभव देत आहेत, असे सांगितले.
प्रसिद्ध गझलकार रघुनाथ पोवार यांनी शुभेच्छा देताना या उपक्रमात कवींनी पुस्तकाला बोलते केले. ही सोपी गोष्ट नाही, असे सांगून एखाद्या कवीचे पुस्तक हे अपत्य मानले जाते. पुस्तक ही कवीची स्वयंनिर्मिती असल्याचे नमूद केले.
गणेश कोळी मनोगतात म्हणाले की, पुस्तक म्हणजे कवीचे अंतर्मन असते. भावना, कल्पना, वास्तवता यांनी सजलेले घर असते.
या उपक्रमात प्रा. चंद्रकांत मढवी यांनी उधळ्या (कादंबरी), ज्योत्स्ना रजपूत यांनी आभासऋतू (कवितासंग्रह), छाया गोवारी यांनी देवदासीची पावले (कथासंग्रह), स्मिता गांधी यांनी माझ्या कविता (कवितासंग्रह) आणि गणेश कोळी यांनी माझी पत्रकारिता या पुस्तकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
 प्रास्ताविकात विजय पवार यांनी पुस्तकाचे भावविश्व कवींनी उलगडावे म्हणून या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन योगिनी वैदू यांनी, तर आभार मंदाकिनी हांडे यांनी मानले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यात हिंमत, म्हणूनच त्यांनी करून दाखवले -काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत

पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्व आहेत. राजकीय चपला बाजूला सारून ते समाजासाठी …

Leave a Reply