अलिबाग : प्रतिनिधी
चेंढरे येथील बाफनाबाग परिसरात चोरी करून पळ काढणार्याला अलिबाग पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले. त्याच्याकडून चोरून नेलेला मुद्देमालही हस्तगत केला. नागडोंगरी येथील बाफनाबाग सोसायटीतून पाण्याचा पंप आणि दुर्मिळ पितळी घंटा चोरीला गेली होती. या संदर्भात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलीस निरीक्षण के. डी. कोल्हे यांनी या प्रकरणाची तातडीने तपासयंत्रणा कामाला लावल्या होत्या. तपासाची चक्रे फिरली आणि अवघ्या दोन तासात शहरातील तळकर नगर येथील अनिल चव्हाण या तरुणास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरून नेलेला पाण्याचा पंप आणि पितळी घंटा जप्त करण्यात आली. अनिल चव्हाण (रा. तळकर नगर, अलिबाग) हा तरुण गेली काही वर्ष पुणे जिल्ह्यात स्थायिक होता. तिथे बिगारी काम करत होता. दिवाळी सणासाठी तो अलिबाग येथे घरी आला होता. या वेळी त्याने ही चोरी केली. मात्र पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने जेरबंद केले. यापुर्वीही त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्याला अलिबाग येथील न्यायालया समोर हजर करण्यात आले. या वेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपासीक अंमलदार रुपेश बी. निगडे आणि एस. टी. फड, अक्षय जाधव यांनी या तपासात महत्वाची भुमिका बजावली.