नांदगाव समुद्रकिनार्यावर ठसे; वनविभागाकडून पाहणी
मुरूड : प्रतिनिधी
खालापूरनंतर आता मुरूड तालुक्यातील नांदगाव समुद्रकिनार्यावर बिबट्या येऊन गेल्याच्या पाऊलखुणा नागरिकांना दिसून आल्या आहेत. वनविभागानेही त्यास दुजोरा दिला आहे.
फणसाड अभयारण्यातील एक बिबट्या अन्नाच्या शोधार्थ बुधवारी रात्री नांदगाव समुद्रकिनार्यावर आला होता. त्याच्या पावलांचे ठसे गावकर्यांना वाळूत दिसले. याची खबर ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल प्रशांत पाटील व कर्मचार्यांना दिली. त्यानुसार पाटील यांनी किनार्यावर येऊन बिबट्याचे ठसे तपासले व त्यांना पीओपीमध्ये टाकून संग्रहित केले. माजी सरपंच राजेश साखरकर, शैलेश दिवेकर, संजय गाणार, महेंद्र चौलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फणसाड अभयारण्य नांदगाव किनार्याला लागून असल्याने बिबट्या अन्नाच्या शोधार्थ खाली उतरला असावा, असा वनखात्याच्या अधिकार्यांचा तर्क आहे.