वाहनचालक संतप्त; रिक्षा संघटना आंदोलन करणार

कर्जत : बातमीदार
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) नेरळ स्थानकात पोहचण्यासाठी असलेला रस्ता खराब झाला आहे. रस्त्यावर केवळ माती शिल्लक उरली असून त्यामुळे धुळीचे लोट रस्त्यावरून चालताना तोंडावर उडत आहेत. नेरळ एसटी स्थानक, सरकारी दवाखाना आणि रेल्वे स्थानक या ठिकाणी जाणारा हा रस्ता दुरूस्त करावा यासाठी स्थानिक सर्व रिक्षा संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
नेरळमधील एसटी स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रेल्वे स्थानकात पोहचण्यासाठी नेरळ-कळंब रस्त्यावरून एसटी स्टॅण्डकडे जाणार्या रस्त्याचा वापर केला जातो. त्या 500 मीटर लांबीच्या रस्त्यावर मागील 13 वर्षात एकदाही डांबर टाकण्यात आले नाही. या रस्त्यावर डांबर टाकण्याची तसदी रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा नेरळ विकास प्राधिकरणाने घेतली नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या रस्त्यावर पूर्वी सुरक्षा भिंती आणि लहान साकव बांधण्यात आला आहे. त्यामुळे या रहदारीच्या रस्त्यावर किमान पाच वर्षांनी डांबरीकरण होणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे स्थानिक यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत.
या रस्त्याच्या नवीन निर्मितीबाबत रिक्षा संघटना सातत्याने आवाज उठवत आहेत, पण स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि या ठिकाणी व्यवसाय करणारे रिक्षाचालक हे आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी आंदोलन करण्याची तयारी सुरू केली असून, सर्व रिक्षाचालक हे नेरळ-कळंब रस्ता रोखून धरतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
येथे 25 वर्षे व्यवसाय करणार्या जय मल्हार रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय हजारे, ओमकार रिक्षा संघटनेचे सल्लागार रमेश कडव, जय हनुमान रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गजू वाघेश्वर, साई एकवीरा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद विरले व जय भोलानाथ रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अमर मिसाळ यांची या रस्त्याबाबत आंदोलनाची भूमिका आहे.