Breaking News

बाईक न दिल्याने विद्यार्थ्याने शाळेत पेटवून घेतले

पनवेल, कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदार,

शाळेत जायला वडिलांनी मोटरसायकल न दिल्याने एका अकरावीच्या विद्यार्थ्याने कळंबोली येथील सुधागड हायस्कूलच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 15) घडली. शिवम दीपक यादव (17) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो गंभीररीत्या भाजला आहे. त्याला ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवम यादव (17) हा विद्यार्थी शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत आला, मात्र तो वर्गात न जाता दुसर्‍या मजल्यावरील बाथरूममध्ये गेला आणि त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यानंतर तो जळालेल्या अवस्थेत बाहेर आला. त्या वेळी तेथील शिक्षकांनी आग विझवली. उपमुख्याध्यापक बंडू कसबे यांनी शाळेच्या शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सोबत घेऊन शिवमला उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी यामागचे कारण विचारले असता वडिलांनी कॉलेजमध्ये जाण्याकरिता बाईक न दिल्याने हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. त्याला अधिक उपचाराकरिता ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.

या घटनेचा अधिक तपास कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्चना चिवटे करीत आहेत. शिवमचे वडीलदेखील पोलीस खात्यात कार्यरत आहेत.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply