Breaking News

भविष्याचा रोडमॅप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामुळे बहुतांश भारतीय जनतेच्या मनात उत्साहाचे भरते आले. येत्या काही वर्षांतच भारतीयांच्या वाट्याला आणखी अच्छे दिन येणार याची खात्रीच जणू पटून गेली. हे अच्छे दिन भारतीय जनतेच्या वाट्याला यावेत यासाठी मोदी सरकार गेली नऊ वर्षे अहोरात्र राबत होते याची जाणीव आपण सदैव ठेवली पाहिजे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांद्वारे दरवर्षी महत्त्वाचा संदेश दिला जातो. ही परंपरा गेली 76 वर्षे सुरू आहे, त्यात एकदाही खंड पडलेला नाही. तथापि आधीच्या दशकांमध्ये स्वातंत्र्यदिनाचे पंतप्रधानांचे भाषण हा निव्वळ एक उपचार होऊन गेलेला होता. पंतप्रधानपदी आल्यानंतर मोदी यांनी मात्र त्या भाषणामध्ये रंग भरला. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी नेमके काय बोलणार याची वाट जसे त्यांचे समर्थक पाहात असतात तसेच विरोधक देखील सावधपणे प्रतिक्षेत असतात. इतकेच नव्हे तर सार्‍या जगाचे लक्ष पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाकडे लागलेले असते. यंदा पंतप्रधान मोदी यांनी लालकिल्ल्यावरून आपले दहावे भाषण दिले. ते 89 मिनिटांचे होते. या भाषणामध्ये त्यांनी भारताच्या 140 कोटी लोकसंख्येलाच आपले परिवारजन असे संबोधले. संपूर्ण देशाला परिवार मानणारा पंतप्रधान भारताला लाभला आहे हे भारतीयांचे भाग्यच म्हणावयाचे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मणिपूरमधील दुर्भाग्यपूर्ण हिंसाचाराचाही उल्लेख केला. तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे असा दिलासा देताना सारा देश मणिपूरच्या जनतेच्या पाठिशी उभा आहे, अशी ग्वाहीदेखील दिली. दोन कोटी भगिनींना लक्षाधीश बनवण्याची आगळीच योजना त्यांनी या वेळी मांडली. ‘लखपती दीदी’ या नावाने राबवली जाणारी ही योजना लोकप्रिय ठरणार यात काही शंका नाही. देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या नेमक्या दुखण्यांवर बोट ठेवले. भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरणाचे राजकारण या तीन अनुचित गोष्टी भारताच्या विकासाला मारक ठरतात. या तिन्ही भस्मासुरांचे निर्दालन करण्याच्या मोहिमेत मला सर्वांची साथ हवी आहे. भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेली मोहीम अशीच सुरू राहील असे त्यांनी निग्रहाने सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये येत्या काही वर्षांतच भारत कशाप्रकारे प्रगती करेल याचा जणु शब्दांच्या साह्याने नकाशाच काढून दाखवला. येत्या काही वर्षांतच जगातील तिसर्‍या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या स्वरुपात भारत सशक्तपणे उभा राहील. इतकेच नव्हे तर 2047 सालापर्यंत भारत एक महासत्ता झालेला असेल असे त्यांनी ठासून सांगितले. पंतप्रधानांच्या भाषणामुळे सामान्य जनतेत उत्साह संचारला असला तरी विरोधकांची तोंडे मात्र पार सुकली असतील यात काही शंका नाही. भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरण या तिन्हींविरुद्धची आघाडी पंतप्रधान उघडणार याचा अर्थ विरोधकांचीच पळता भुई थोडी होणार असा लावला जात आहे. जे स्वच्छ असतील त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही, परंतु ज्यांनी भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरणाचे राजकारण यांच्या साह्याने वर्षानुवर्षे सत्तेचा उपभोग घेतला, त्यांना मात्र योग्य तो संदेश गेला आहे. लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांनी केलेले भाषण हे निवडणुकीचेच भाषण होते अशी टीका आता विरोधीपक्षांचे नेते करत आहेत, परंतु त्याला काहीही अर्थ नाही. जनसामान्यांना आपले उज्ज्वल भविष्य पंतप्रधानांच्या शब्दांमुळेच स्पष्टपणे दिसले आहे.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply