अलिबाग : प्रतिनिधी
खिरापतीसारख्या देण्यात येणार्या रायगडभूषण पुरस्काराची निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणे, निवृत्तीवेतन धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पाहिल्या मंगळवारी पेन्शनर आदालत भरविणे, असे दोन महत्त्वाचे निर्णय शुक्रवारी (दि. 15) झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सभेत एकमताने घेण्यात आले. नियोजन भवन येथे ही सभा झाली.
रायगडभूषण पुरस्कार एकाच व्यक्तीला दोनवेळा दिला गेल्याचे जि.प. सदस्य मैथिली खेडेकर यांनी आयत्या वेळच्या विषयात चर्चा करताना सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्या वेळी सभागृह अवाक् झाले. रायगडभूषण पुरस्काराची निवड, त्यांची संख्या यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे शेकापच्या सदस्या चित्रा पाटील यांनी ही बाब गंभीर असल्याची टीका करून सत्ताधार्यांना घरचा आहेर दिला. पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी एक समिती नेमावी अशी मागणी सदस्यांनी केली. ती अध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील यांनी मान्य केली. तशी घोषणा करण्यात आली.
जे कर्मचारी सेवेतून निवृत्त होतात त्यांना आपले निवृत्तीवेतन लागू होण्यासाठी अनेक फेर्या माराव्या लागतात. त्यांना अनेक अडचणींना सामोर जावे लागते. निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी पेन्शनर आदालत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सभेत जाहीर करण्यात आले.
कामे मंजूर झालेली असतात, मात्र त्याच्या फाईली गहाळ होतात. त्यामुळे काम सुरू करण्यात अडचणी येतात असा आरोप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी केला. ज्या फाईली हरवल्या आहेत त्या शोधल्या जातील. यापुढे एकही फाईल गहाळ होणार नाही, असे आश्वासन अॅड. पाटील यांनी दिले.
ग्रामपंचायतींमध्ये जी कामे केली जातात त्यांची अंदाजपत्रके इंग्रजीमध्ये असतात. ग्रामीण भागातील सरपंचांना ते समजणे कधी-कधी अवघड होते. त्यामुळे ही सर्व अंदाजपत्रके मराठीमध्ये द्यावीत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूर्वी रायगड जिल्हा परिषदेने किती कामांना मंजुरी दिली आहे त्याची माहिती मिळावी.
2017-2108 या आर्थिक वर्षात पाणीपुरठा योजनांवर किती खर्च झाला त्याची माहिती जाहीर करावी, अशा मागण्या भाजपचे प्रतोद अमित जाधव यांनी केल्या. पंचायत समितीच्या सभापतींना ग्रामसेवकांची बदली करण्याचा अधिकार नसताना ते ग्रामसेवकांची बदली करतात, असा आरोपही अमित जाधव यांनी केला.
कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई करा : अमित जाधव
पनवेल व उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींची खाती कर्नाळा सहकारी बँकेत काढण्यात आली होती. ही बँक अडचणीत आल्यामुळे ग्रामपंचायतींना भूर्दंड पडणार आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींची खाती कर्नाळा बँकेत उघडण्यात आली आहेत त्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रतोद अमित जाधव यांनी या वेळी केली.