देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 15) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीची मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी या भेटीदरम्यान फडणवीस यांनी केली. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी या मुद्द्यावर लगेच कार्यवाही करण्याचे मान्य केले.
सत्तास्थापनेचा पेच न सुटल्याने, तसेच कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करू न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना अडचणी येत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांचे या विषयावर लक्ष वेधले. ट्विटरच्या माध्यमातून या भेटीची त्यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना मदतरूपी दिलासा दिला जातो. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट असल्याने काही सुविधा तात्पुरत्या बंद आहेत, पण मुख्यमंत्री सहायता निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे आणि गरजू रूग्णांना मदत देण्यात यावी. म्हणजे एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी विनंतीही या भेटीदरम्यान फडणवीस यांनी केली.