इस्लामाबाद : वृत्तसंस्था
श्रीलंकेने डिसेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये दोन कसोटी सामने खेळणार असल्याचे निश्चित केले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये एका दशकापेक्षाही मोठ्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चषकाचाच एक भाग असेल. वन डे कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि टी-20 कर्णधार लसिथ मलिंगासह 10 वरिष्ठ खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव नाव मागे घेऊनही श्रीलंकेने यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानात वन डे आणि टी-20 मालिका खेळली होती.
आगामी कसोटी मालिकेतील पहिला सामना 11 ते 15 डिसेंबरदरम्यान रावळपिंडीमध्ये होणार आहे, तर दुसरा सामना 19 ते 23 डिसेंबरदरम्यान कराचीत खेळवला जाईल. पाकिस्तान क्रिकेट आणि इतर देशांप्रमाणेच सुरक्षित देश म्हणून प्रतिमा तयार करण्यासाठी ही एक चांगली संधी असल्याचे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे संचालक झाकीर खान म्हणाले. शिवाय त्यांनी श्रीलंकेचे आभारही मानले.