पोलादपूर : प्रतिनिधी
शहरातील न्यू सातारा पतसंस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ शॉर्टसर्किट झाल्यानंतर भैरवनाथनगरात जीवंत वीजवाहिनी तुटून रस्त्यावर पडण्याची घटना सलग दोन घडल्यामुळे पोलादपूर महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पावसाळ्यापूर्वीची कामे या शिर्षकाखाली पोलादपूर तालुक्यात रोज बारा बारा तास वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. दरम्यान, शहरातील न्यू सातारा पतसंस्थेच्या निवासी संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळील वीज मीटरच्या जागी पॉवर सप्लाय केबलमधून होणार्या ठिणग्यांचा चित्तथरारक खेळ मंगळवारी सकाळी परिसरातील नागरिकांनी पाहिल्यानंतर प्रचंड घबराट पसरली होती. त्यानंतर गुरूवारी (दि. 26) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भैरवनाथनगर येथील विजेच्या खांबावरून जीवंत वीजवाहिनी तुटून जमिनीवर पडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होेते. दरम्यान, ठेकेदाराकडील लाईनमनना पाठवून तुटलेली वीजवाहिनी जोडली असून, वीजप्रवाह सुरळीत केला असल्याची माहिती महावितरणचे अभियंता सुनील सूद यांनी दिली.