सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

कर्जत ः बातमीदार
कोरोनामुळे आधी जमावबंदी आणि नंतर संचारबंदी लावण्यात आल्यानंतर नेरळमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भाजीपाला, दूध आणि फळांचे मार्केट हलवण्यात आले. तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पोलिसांकडून धडे दिले गेले, मात्र त्याच मैदानात भरवला जाणारा बाजार आता सोशल डिस्टन्सिंचे तीन तेरा वाजवत आहे. दरम्यान, 20 फेरीवाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मैदानातील बाजारात आता 100हून अधिक फेरीवाले दाटीवाटीने बसले आहेत. त्याचवेळी नेरळमध्ये भाजीपाला, फळे आणि बाजारातील किराणा माल चढ्या भावाने विकला जात आहे. कोरोनामुळे नेरळ बाजारपेठेमध्ये सुरू असलेले भाजीपाला विक्रेते आणि दूध तसेच फळांची विक्री करणारी दुकाने नेरळ पोलीस ठाणे आणि नेरळ ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन 23 मार्च रोजी नेरळ गावात मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हलविली.तेथे सुरुवातीला 10 भाजीपाला विक्रेते, पाच दूध आणि पाच फळविक्रेत्यांची दुकाने लावण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी एक मीटर अंतर सोडून दुकाने लावण्यासाठी चौकोन आखून दिले होते. त्याचवेळी खरेदीसाठी येणार्यांसाठीही चौकोन आखण्यात आले होते, मात्र चार दिवस नवलाईचे याप्रमाणे नेरळमधील या मैदानातील बाजारात सोशल डिस्टन्स ठेवण्यात आले. मात्र आज या बाजारातील दुकाने 100च्या पुढे गेली आहेत. फेरीवाले सोशल डिस्टन्सिंगही पाळत नाहीत. सकाळ-सायंकाळी भरणार्या बाजारात नेरळ पोलिसांचा खडा पहारा असतो. तरीही फेरीवाले एकमेकांना चिकटून बसलेले दिसून येत असतानादेखील कोणतीही कारवाई केली जात नाही. 60 टक्के फेरीवाले नेरळबाहेरील असून त्यात अर्धे उत्तर भारतीय आहेत. येथे भाजीपाला आणि फळेही चढ्या भावाने विकली जात आहेत.