Breaking News

निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, जय भारत, लालबाग स्पोर्ट्सची आगेकूच

मुंबई ः प्रतिनिधी

जय भारत क्रीडा मंडळ, साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब, श्री गणेश क्लब, लालबाग स्पोर्ट्स, जय खापरेश्वर क्रीडा मंडळ, नवोदित संघ यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात तिसरी फेरी गाठली. वडाळा-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने अत्यंत चुरशीच्या लढतीत बालवीर क्रीडा मंदिराचा प्रतिकार 28-26 असा मोडून काढला. साहिल राणे, दिशांत डांगे यांची आक्रमक चढाया त्याला रोहित कदम यांने दिलेली पकडीची उत्तम साथ यांच्या जोरावर बालवीरने पहिल्या डावात 17-09 अशी भक्कम आघाडी मिळविण्यात यश मिळविले होते. पण दुसर्‍या डावात ही आघाडी राखण्यात व संघाला विजयी त्यांना अपयश आले. दुसर्‍या डावात जय भारतच्या निखिल पाटील, रोहन पाटील यांनी धारदार आक्रमण करीत बालवीरचा बचाव खिळखिळा करीत भराभर गुण वसूल केले. शुभम मटकरने धाडशी पकडी करीत त्यांना छान साथ दिल्यामुळेच जय भारताने हा अशक्य वाटणार्‍या विजयाला गवसणी घातली.साऊथ कॅनरा स्पोर्ट्सने सिद्धीप्रभाला 29-27 असे चकवित तिसरी फेरी गाठली. गणेश सिंग, अमन शेख यांच्या दमदार चढाया त्याला नितीन मंडलची मिळालेली पकडीची बहुमोल साथ याच्या जोरावर साऊथ कॅनराने विश्रांतीलाच 14-05अशी आश्वासक आघाडी मिळविली होती. उत्तरार्धात सिद्धिप्रभाच्या ऋतुराज साळुंखे, ओमकार ढवळे यांना बर्‍यापैकी सूर सापडला. पण वेळेचे गणित त्यांना साधता न आल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply