Breaking News

तणाव व शारीरिक व्याधीमुक्तीसाठी योगसाधना उपयुक्त -सिद्धार्थ शिलवंत

कर्जत : प्रतिनिधी

शरीर आणि मन एकत्र येणे योगाने शक्य होते. नित्य नियमाने योगा केल्यास आपले मन प्रसन्न राहतेच शिवाय शारीरिक व्याधी दूर होतात, असा दावा अंबिका योग कुटीरचे कल्याण शाखा संचालक सिद्धार्थ शिलवंत यांनी कर्जत येथे केले.

श्री छत्रपती शिवाजी मंडळ आणि श्री अंबिका योग कुटीर (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जतमधील मंजुळा जोशी सभागृहात विनामूल्य त्रैमासिक योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन कर सल्लागार अजित ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात सिद्धार्थ शिलवंत बोलत होते. आपले जीवन सुखकर व निरोगी होण्यासाठी नियमित योगा करावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

हल्ली प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असतो. तणावामुळे स्वास्थ बिघडते. त्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळते. विशेषतः महिलांचे विकार, मधुमेह, हृदयरोग अशा व्याधींना योगामुळे मुक्ती मिळते, असे शिलवंत यांनी सांगितले. त्यानंतर योग शिक्षकांनी योगाची प्रात्यक्षिके सादर करून अनेक सूचना दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय म्हसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महिला संचालिका संगीत महाजन यांनी प्रार्थना सादर केली. वामन सोनोने यांनी हटयोगी निकम गुरुजी यांचा जीवनक्रम सादर करून त्यांना आदरांजली अर्पण केली. अरुण सावंत, अशोक शिंदे, विनायक गुरव, राजेश मोरे, बाळू दगडे, संतोष गुरव यांच्यासह योगाभ्यास वर्गात प्रवेश घेतलेले पुरुष व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. एन. बी. जुन्नरकर यांनी आभार मानले.

Check Also

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित …

Leave a Reply