Breaking News

समानता हवीच!

राजेरजवाड्यात कोंडून ठेवलेली ज्ञानगंगा झोपडी-झोपडीतून वाहून शिक्षण देण्याचे कार्य करून ही ज्ञानगंगा उंबरठ्यापर्यंत नेऊन मुलींना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करणार्‍या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्याला महिला दिनानिमित्त कोटी कोटी वंदन. स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या पुत्राला त्या ध्येयाप्रत पोहोचवण्यासाठी केलेले उच्च कोटीचे संस्काराच्या शिरोमणी राष्ट्रमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा. म म्हणजे महत्त्वाकांक्षी. हि म्हणजे हितवादी आणि ला म्हणजे लाजवंती. अशा तमाम महिलांना आजच्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

‘अरे संसार संसार,

जसा तवा चुल्ह्यावर

आधी हाताला चटके,

तेव्हा मिळते भाकर.’

पुरातन काळापासून चालत आलेल्या स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्द्यावर अनेक भाषणे, चर्चासत्र, कायदे निघालेत अन् रंगलेतही, पण अजूनही परिस्थिती जैसे थे असलेली दिसून येते, मात्र आज ही परिस्थिती बदलण्याची वेळ आलेली आहे. कारण कित्येक कुशल नेतृत्वाच्या महिला चूल आणि मूल यातच अडकून पडलेल्या आहेत. आज देशाला योग्य निर्णयक्षमतेची, कुशल नेतृत्वाची गरज आहे. वेळ आली आहे समानता हे मूल्य कृतीत उतरवण्याची. आज स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेत आहे हे अत्यंत गौरवास्पद आहे, परंतु अजूनही काही शहरात स्त्रीला 33 टक्के आरक्षण देऊनही राजकीय क्षेत्रात केवळ कागदोपत्रीच, बॅनरवरच  नगराध्यक्षा, नगरसेविका व सरपंच पदावर आहे. निर्णय व आर्थिक कारभार अजूनही तिचा पतीच चालवतो. हे कुठे थांबवायचे असल्यास प्रत्येक पुरुषाच्या मनात समानतेचे बीज पेरणे गरजेचे आहे. त्यांची मानसिकता बदलणे महत्त्वाचे आहे. आज शिक्षणक्षेत्रात मुलींनी गगनभरारी घेतलेली आहे, पण लग्न करण्यासाठी योग्य जोडीदार मिळत नाही. काही समाजात अजूनही मुलींना आपल्यापेक्षा कमी शिक्षण झालेल्या मुलांसोबत त्या समाजातील रूढीपरंपरांचा स्वीकार करून आपल्या इच्छा, आकांक्षांना तिलांजली द्यावी लागते.

आज देशातील प्रत्येक महिलेला ज्या वीरपत्नी, वीरमाता यांचा अभिमान बाळगावा. उदा. महाराष्ट्राची कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा ‘भावूक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना’ असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. त्याचबरोबर सबइन्सपेक्टर रेखा मिश्रा. 2008 मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचे कार्य केले. विविध कारणांमुळे स्वतःचे घर सोडून निघून आलेल्या, मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या व भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला व स्त्रीजातीला त्यांचा अभिमान वाटतो. जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘अरूणिमा’! अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरूणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली. ‘एव्हरेस्ट गाठणे हे भल्याभल्यांचे स्वप्न असते; पण सकारात्मक दृष्टीने अरूणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले. आज वेळ आलेली आहे प्रत्येक महिलेला आपल्यातील जिद्दी अरूणिमा शोधण्याची. आपल्या मुलांवर शैक्षणिक ध्येय गाठण्यासाठी जसे तयार करतो त्याबरोबरच माता जिजाऊंच्या संस्कारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुशल शासक बनवण्यासाठी प्रत्येक महिलेला छत्रपती शिवरायांसारखे पराक्रमी युवा घडवणे गरजेचे आहे. यासाठी हवाय या पृथ्वीतलावर ईश्वराने ज्या दोन बुद्धिमान जीवांची निर्मिती केली आहे त्या जातीतील स्त्री पुढे जाण्यासाठी पुरुषाने आपली मानसिकता बदलून व अंहमपणा बाजूला सारून तिच्यातील खर्‍या उमेदीला, कर्तृत्वाला प्रकाशमय करून योग्य दिशा देणे गरजेचे आहे. बर्‍याच महिलांना नोकरी करताना तारेवरची कसरत करावी लागते. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत हातातील कामे सुटत नाही. पती-पत्नी दोघेही मिळून प्रत्येक कामाची समान विभागणी केल्यास तिला स्वतःसाठी वेळ काढता येईल. लग्नापूर्वी वाचन-लेखनाची आवड असलेल्या मुलीचे जीवन चूल आणि मूल याभोवतीच गुरफटलेले दिसून येते.

आजच्या काळात स्त्री-पुरुष या जातीच्या वादात न पडता आपल्यातील कौशल्य ओळखून त्या दिशेने वाटचाल सुरू केल्यास कुठेच स्त्री-पुरुष भेदभावाचा धागा शिल्लक राहणार नाही. म्हणूनच कवयित्री नीरजा आपल्या कवितेत म्हणतात की,

माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे

एक आश्वासक चित्र

उद्याच्या जगाचं जिथं खेळले जातील

सारेच खेळ एकत्र.

भातुकलीच्या प्रवेशताना वास्तवात

हातात हात असेल दोघांचाही

ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि

चेंडू जोडीनं..!

-सारिका सब्बनवार (मद्दलवार), नांदेड

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply