Breaking News

शतकवीर रॉजर फेडरर

दुबईत झालेल्या एटीपी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावून स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपल्या विजेतेपदांची शंभरी गाठली. ग्रीसच्या स्टेफॅनो सित्सिपासला पराभूत करत त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमधील पराभवाची परतफेड तर केलीच; पण अजूनही आपण अशा कित्येक स्पर्धा खेळण्यास सक्षम आहोत, हे दाखवून दिले. चाळीशीकडे झुकलेला असतानाही तो आघाडीवर राहण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच फेडरर अडतिसावा वाढदिवस साजरा करेल, पण त्याचा उत्साह तरुण खेळाडूला लाजवेल असा आहे. आतापर्यंत 20 ग्रँडस्लॅम स्पर्धांचे विजेतेपद त्याच्या खात्यात जमा असले, तरी त्यावर तो तृप्त नाही. रफाएल नदाल, नोवाक जोकोविच हे अनुक्रमे 17 आणि 15 ग्रँडस्लॅम जिंकून फेडररच्या विक्रमाला मागे टाकण्यास उत्सुक आहेत, पण फेडररची विजेतेपदाची भूक लक्षात घेता त्यांनाही इतक्यात हे यश लाभेल, अशी परिस्थिती नाही. जिमी कॉनर्सच्या 109 विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी फेडररला आणखी केवळ नऊ विजय हवे आहेत. ते शक्य होईल की नाही, हे येणारा काळ ठरवेल. दुबईत अंतिम लढतीनंतर त्याने चाहत्यांना आश्वस्त केले की, ‘आतापर्यंतचा प्रवास हा खूपच खडतर होता, मात्र अजूनही माझ्यात किती टेनिस शिल्लक आहे, हे पाहायचे आहे.’ 2001 मध्ये फेडररने कारकिर्दीतील पहिले विजेतेपद पटकाविले होते. त्यानंतरचा हा 18 वर्षांचा प्रवास देदिप्यमान असाच आहे. ज्या सित्सिपासविरुद्ध तो दुबईत जिंकला तो 2001मध्ये अवघ्या दोन वर्षांचा होता. मुख्य म्हणजे, फेडररच्या त्या पहिल्या विजेतेपदावेळी खेळलेले 32 खेळाडू आता टेनिसमधून कधीच निवृत्त झालेत. फेडरर मात्र अजूनही त्याच उत्साहाने खेळत आहे. पुढील वर्षी ऑलिम्पिकचे सुवर्ण जिंकण्याची त्याची जिद्द आहे. 15 खेळाडूंनी आतापर्यंत ती कामगिरी केली आहे. फेडरर त्या पंक्तीतही स्थान मिळवेल, असे दिसते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply