

कर्जत : बातमीदार
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या माथेरानला जगाच्या कानाकोपर्यातून पर्यटक भेट देतात. वाहनांना बंदी असल्यामुळे पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ अशी माथेरानची ख्याती आहे. येथील ’माथेरानची राणी’ म्हणजे मिनीट्रेन. या मिनीट्रेनचा आनंद घेण्यासाठी परदेशातूनसुद्धा पर्यटक येतात, पण गेल्या काही महिन्यांपासून या रेल्वेमार्गामध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे माथेरानची राणी यार्डात विश्रांती घेत आहे. त्यामुळे पर्यटकांना या मिनीट्रेनच्या सफारीला मुकावे लागत आहे.
803 मीटर उंचीवर असलेल्या माथेरानमध्ये 1907पासून सुरू असलेली मिनीट्रेन सध्या बंद आहे. 1 आणि 8 मे 2016 रोजी किरकोळ अपघातांमुळे ती बंद करण्यात आली होती, पण माथेरानकरांच्या एकजुटीमुळे व माहिती कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे 20 महिन्यानंतर ही मिनीट्रेन पूर्ववत झाली. यासाठी रेल्वेने 18 कोटी रुपये खर्च करून हे काम युद्धपातळीवर करून घेतले होते, पण 27 जुलै 2019 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मिनीट्रेनच्या घाटमार्गात रेल्वे रुळाखालची जमीन वाहून गेली, तर काही ठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे नेरळ-माथेरान रेल्वेमार्ग बंद करण्यात आला, पण अमन लॉज-माथेरान शटलसेवा सुरू होती. तिच्या मार्गात कोणतीही अडचण नव्हती, मात्र मध्य रेल्वेने सुरक्षेचे कारण पुढे करत ही शटलसेवाही बंद केली. हा रेल्वेमार्ग पर्यटकांना माथेरान बाजारपेठेपर्यंत घेऊन येत होता. तोच बंद झाल्यामुळे पर्यटकांना सामान घेऊन पायपीट करीत माथेरानमध्ये यावे लागत आहे.
मार्गातील अडचणी
1) माथेरानमध्ये आठ हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वेमार्गाची वाताहात झाली असल्यामुळे बांधकाम साहित्य आणणे जिकिरीचे झाले आहे.
2) डोंगरदर्यांचा भाग असल्याने मोठे दगड नेणे अवघड होऊन बसले आहे.
3) काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तर काही ठिकाणी भूस्खलन होऊन जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे रेल्वेची मालगाडीसुद्धा नेऊ शकत नाही.
पिटलाइन काम सुरू
पिटलाइन म्हणजे इंजीन दुरुस्ती किंवा बोगी दुरुस्ती करण्याचे स्थान. दोन बोग्या उभ्या राहतील इतका मोठा खड्डा करून त्या खड्ड्यावरून रेल्वे लाइन असते. रेल्वे लाइनवर बोगी उभी करून त्या खड्ड्यामध्ये उभे राहून अभियंता बोगी दुरुस्त करतात. या पिटलाइनचे काम युद्धपातळीवर माथेरानमध्ये सुरू आहे.
पर्यटकांची संख्या रोडावली
पर्यटकांचे आकर्षण असलेली माथेरानची राणी गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. मिनीट्रेनच्या रंजक सफरीसाठी येणार्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. मिनीट्रेन बंद असल्यामुळे त्यांची संख्या रोडावली आहे, हे दीपावली पर्यटन हंगामात दिसून आले आहे.