Breaking News

बीएसएनएल सेवेचा मुरूडमध्ये बोजवारा

इंटरनेटअभावी पोस्टाचा कारभार ठप्प

मुरूड : प्रतिनिधी

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ची मुरूडमधील सेवा वारंवार खंडित होत असून, त्याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने ही सेवा दिवसेंदिवस त्रासदायक ठरू लागली आहे. 11 नोव्हेंबरपासून बीएसएनएलची नेट सेवा बंद असल्याने मुरूड पोस्ट ऑफिसमधील सर्व कारभार ठप्प झाला आहे. तसेच शेकडो मोबाइल बंद पडले असून, बँका, सरकारी कार्यालयांचा कारभारदेखील गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने पोस्टाची रजिस्टर एडी व्यतिरिक्त इतर कोणतीही कामे होत नाहीत. विशेषत: पोस्ट बँकेतील पैसे काढता व भरतासुद्धा येत नाहीत. मुरूड पोस्टात अनेक बचत खाती असून इंटरनेट सेवेअभावी या खात्यांतील पैसे देवाणघेवाणीचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. टपालाची नोंद करण्याचे कामसुद्धा नेटवर आधारित असल्याने मुरूडमधील टपाल वितरण व्यवस्थेलासुद्धा मोठा फटका सहन करावा लागत आहे.बीएसएनएलच्या गलथान कारभाराबाबत माजी नगराध्यक्षांसह नागरिक नाराजी व्यक्त करीत असून, बीएसएनएलने कारभार सुधारला नाही तर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बीएसएनएल नेट व भ्रमणध्वनी सेवा वारंवार बंद असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तक्रार करूनसुद्धा त्याची दखल घेतली जात नसल्याने स्थानिक जनता क्रोधित झाली आहे. बीएसएनएल कंपनीने आपला कारभार लवकरात लवकर सुधारावा, अन्यथा जनआंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.

-कल्पना पाटील, माजी नगराध्यक्षा, मुरूड

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply