माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्याच्या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नाही. जे काही झाले ते नियमानुसारच झाले आहे, असे संसदीय कार्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत स्पष्ट केले.
मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल व प्रियांका यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. त्याऐवजी त्यांना सीआरपीएफची झेड सुरक्षा देण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या व दुसर्या दिवशी या मुद्द्यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी याबाबत सरकारने खुलासा करण्याची मागणी केली होती. याबाबत संसदीय कार्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी बुधवारी निवेदन दिले.
’मनमोहन सिंग किंवा गांधी कुटुंबीयांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. केवळ त्यात बदल करण्यात आलेला आहे. केंद्रीय गृहमंत्रालय अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेत असते. त्यानुसारच सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित नाही, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.