कोलकाता : कोलकातातील एका इमारतीत असलेल्या कंपनीच्या कार्यालयावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने छापा टाकला होता. त्यानंतर या इमारतीतून 2000, 500 आणि 100च्या नोटांचे बंडल खाली रस्त्यांवर फेकण्यात आले. हे पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यांवरून जाणार्यांची झुंबड उडाली होती. कोलकातातील एमके पॉइंट इमारतीतील सहाव्या मजल्यावरून बुधवारी दुपारी अचानक नोटांचा पाऊस पडू लागला. कुणीतरी नोटांचे बंडल फेकून देत होता. पैशांचा पाऊस पडत असल्याचे पाहून तेथे लोकांची गर्दी झाली. ते पैसे गोळा करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली. काहींनी मोबाइलवरून या घटनेचे चित्रण केले. पोलीस सूत्रांनुसार महसूल गुप्तचर संचालनालयाचे अधिकारी दुपारी एमके पॉइंट इमारतीत पोहचले. काही वेळात सहाव्या मजल्यावरून कुणीतरी नोटांचे बंडल खाली फेकण्यास सुरुवात केली. काही वेळात इमारतीबाहेर लोकांची गर्दी जमली.
तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
पुणे ः पिंपरी-चिंचवडमध्ये दुसर्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. मयूर मधुकर वाघ (26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेचा अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत. 10 दिवसांपूर्वीच मयूरने वाढदिवस साजरा केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी मोशीतील नक्षत्र सोसायटीमधून मयूर वाघ नावाचा तरुण इमारतीच्या दुसर्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाल्याचा फोन आला. त्याला तातडीने जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास मयूर गॅलरीतून पडला. या वेळी आईवडील घरात होते. मयूर एका खासगी कंपनीत कामाला होता.
’युरोपा’वर पाणी?
वॉशिंग्टन : सूर्यमालेमधील गुरू हा आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. या ग्रहाचा चंद्र ’युरोपा’ म्हणून ओळखला जातो. या युरोपा ग्रहावर पाण्याचे बाष्प आढळल्याची माहिती अमेरिकी अंतरिक्ष संस्था ’नासा’कडून मिळाली आहे. गुरूच्या चंद्रावर पाणी आढळल्याने या उपग्रहावर मोठा समुद्र अस्तित्वात असल्याची शक्यता वैज्ञानिकांकडून वर्तवली जात आहे. अमेरिकेतील हवाई शहरातील डब्ल्यू. एम. केक या वेधशाळेच्या मदतीने युरोपावरील पाण्याच्या बाष्पाचा अंदाज घेण्यात आला. युरोपा उपग्रहावर पृष्ठभागावर हा बर्फ साचला असून कधी कधी फवार्यांसारखे पाणी बाहेर येते. याचे पुरावे संशोधकांकडे असल्याची माहिती आहे, मात्र पाण्याचे मॉलेक्युल्स मोजले नसल्याने गुरूच्या चंद्रावर खरंच पाणी आहे का, याची खात्री देणे शक्य होत नव्हते, मात्र नुकत्याच नासाने केलेल्या संशोधनामुळे गुरूच्या आतील रचनेचा अभ्यास करणे सोपे होणार असल्याचे नासाने म्हटले आहे.