Breaking News

दु:खाचा डोंगर

कोरोना विषाणू विरुद्धची लढाई हिंमत न हारता एकजुटीने लढावी लागेल असे मोदीजींनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भारतीय जनता गेले वर्षभर जिद्द न सोडता कोरोनाशी लढते आहे. याबद्दल मोदीजींनी जनतेचे वेळोवेळी कौतुक देखील केले आहे. मात्र, एकजुटीचे हे कलम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना अजुनही पाळता येत नाही हे मान्य करावे लागेल. नाशिक येथील दुर्घटनेचे बिलकुल राजकारण होऊ नये असे सार्‍यांनाच प्रामाणिकपणे वाटते ते यासाठीच.

कोरोनाच्या महाभयंकर साथीमध्ये जनसामान्यांना आणखी किती भोग भोगावयास लागणार आहेत हे सांगता येणे कठीण आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये संपूर्ण देशात इतका प्रचंड हाहाकार उडाला आहे की हाहाकार हा शब्द देखील फिका पडावा. गेल्या वर्षीपासून आपण सारे या जीवघेण्या रोगाशी प्राणपणाने झुंजत आहोत. या महामारीत अनेकांनी आप्तस्वकीय गमावले आहेत. मृत्यूचे हे थैमान लवकरात लवकर थांबावे असे प्रत्येकालाच वाटते. परंतु कोरोनाची पहिली लाट ओसरतानाच दुसरी लाट त्सुनामीपेक्षा भयंकर वेगाने अंगावर येऊन आदळली आहे. मृत्यूचा हा जीवघेणा नाच अजूनही थांबायला तयार नाही. किंबहुना, त्यात वाढच होताना दिसते आहे. बुधवारी दुपारी नाशिक महानगरपालिकेच्या झाकिर हुसेन रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या टाकीमधून अचानक गळती होऊ लागली. हे रुग्णालय तसे मोठे आहे. दीडशेहून अधिक अत्यवस्थ रुग्ण तेथे उपचार घेत होते. त्यातील 63 रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेतील होते. प्राणवायुच्या पुरवठ्याचा दाब अचानक कमी झाल्यामुळे 22 रुग्ण अक्षरश: घुसमटून मरण पावले. आणखी काही अतिशय गंभीर रुग्णांना अन्यत्र हलवण्यात आले असून ऑक्सिजनचा पुरवठा देखील पूर्ववत सुरू झाला आहे. एका जपानी कंपनीने ही ऑक्सिजन यंत्रणा उभी करून दिली होती असे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देखील जाहीर झाली आहे. चौकशीत दोषी आढळलेल्यांना योग्य ती शिक्षा होईलच. परंतु असले अपघात भविष्यात घडू नयेत यासाठी सार्‍यांनीच यापुढे दक्ष राहण्याची गरज आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अवघा महाराष्ट्रच व्हेंटिलेटरवर गेल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्राची सध्याची रोजची ऑक्सिजनची गरज पाहता राज्यातील रुग्ण या घटकेला किती मोठ्या संख्येने गंभीर आजारी आहेत हे कळून येते. ऑक्सिजनचा तुटवडा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सर्वत्र भासत आहे. त्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केला होताच. शत्रू राष्ट्रात देखील नाशिकसारखी दुर्घटना घडू नये असेच कुठल्याही सुजाण नागरिकाला वाटत असेल. दुर्दैवाने हा अपघात आपल्या महाराष्ट्रात घडला आहे. हा अपघात घडल्यानंतर रुग्णांच्या नातलगांनी केलेला आक्रोश आणि त्यांचा संताप समजून घेण्याजोगा आहे. परंतु काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या दुर्घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, तो अधिक दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल तेव्हा वस्तुस्थिती समोर येईलच. परंतु ही वेळ राजकारणाची नसून या दुर्घटनेमुळे खचून न जाता अन्य कोरोना रुग्णांना वैद्यकीय मदतीचा हात देणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून योग्य तो धडा घेणेच सर्वांच्या हिताचे आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply