नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रत्येक दोन वर्षांनी जागतिक दर्जाच्या क्रिकेट स्पर्धेची तयारी दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 2024पासून सुरू होणार्या आठ वर्षांच्या कार्यक्रम पत्रिकेत भारताने दोन विश्वचषकासह तीन जागतिक स्पर्धांसाठी
दावेदारी केली आहे.
बीसीसीआयच्या ऑनलाइन कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयने 2025ची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, 2028ची ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि 2031मध्ये होणार्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकासाठी दावेदारी केली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकार्याने दिली.
2017नंतर न झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे, असे नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले होते. त्यानुसार आगामी कार्यक्रम पत्रिकेत त्याचा समावेश करण्यात येणार आहे. 2023च्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकानंतर भारताने आगामी योजना या वेळी स्पष्ट केल्या. पुढील कार्यक्रम पत्रिकेत एकदिवसीय विश्वचषकात 14 आणि ट्वेन्टी-20 विश्वचषकात 16 संघ असतील, असे आयसीसीने म्हटले आहे.
दरम्यान, मागील हंगामात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्यामुळे खेळाडूंना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. त्याच्या वाटपाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी बीसीसीआयने 10 सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीत चारही विभागांचे एकेक प्रतिनिधी, चार कार्यकारिणी सदस्य, अध्यक्ष आणि सचिव यांचा समावेश असेल.
ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 10 कोटींचे साहाय्य
टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या भारतीय क्रीडापटूंच्या तयारीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचे ठरवले आहे. या पैशांचा उपयोग खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि सुविधा पुरवण्यासाठी केला जाणार आहे. 23 जुलैपासून ऑलिम्पिकला प्रारंभ होणार आहे.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …