तत्काळ उपाययोजना झाल्याने संभाव्य दुर्घटना टळली
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
एक्सप्रेस वे वरील आडोशी गावाजवळ मंगळवारी (दि. 14) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास प्रोपोलिन गॅस भरलेल्या टँकरला कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर टँकरमधील अतिज्वलनशील प्रोपोलिन वायुची गळती सुरू झाली. मात्र तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्याने संभाव्य दुर्घटना टळली.
मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरील आडोशी गावच्या हद्दीत मुंबईकडे जाणार्या प्रोपोलिन गॅस भरलेल्या टँकर (जिजे-12,एटी-5496) ला कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाल्याने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली.
अपघाताचे वृत्त समजताच एक्सप्रेस वे वरील सर्व आपत्कालीन यंत्रणा, बोरघाट पोलीस पथक, खोपोली अग्निशमन दल, पोलीस व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक ग्रुपचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोेलिसांनी वायुगळती निष्णांत धनंजय गीध यांना पाचारण केले. गीध आवश्यक साहित्य घेऊन रसायनी येथून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही मिनिटांतच वायुगळती थांबविण्यात यश मिळविले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकर व कंटेनर महामार्गावरून बाजूला नेले. या दरम्यान एक्स्प्रेस वे वरील मुंबई-पुणे लेन काही वेळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती.