Breaking News

एमआयडीसीत आपत्ती व्यवस्थापन अनियोजित, तळोजातील कंपन्यांसह अधिकार्यांचे दुर्लक्ष

कळंबोली : वार्ताहर

तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या आहेत, तसेच या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाकरिता ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. आपत्ती आल्यानंतर त्वरित काय करायचे याविषय नियोजन नाही, तसेच शीघ्रकृती टीम नसल्याने अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे एमआयडीसीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

तळोजा परिसरात 907 हेक्टर जागेवर एमआयडीसी वसविण्यात आली. या ठिकाणी 1200 भूखंड असून शेकडो छोट्या मोठ्या कारखान्यांची नोंद आहे. औद्योगिक उलाढालही मोठी आहे. त्यामध्ये इंजिनीअरिंग, मत्स्य प्रक्रिया, फूड, केमिकल्स आदी कारखान्यांचा समावेश आहे. या ठिकाणी लाखो कामगार कार्यरत आहेत. एमआयडीसी परिसरात आगी लागण्याच्या अनेक घटना घडल्या असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कारखान्यातील घातक वायुगळतीमुळे कामगारांसह परिसरातील गावांनाही फटका बसत आहे.

अग्निसुरक्षा असो, वायुगळती असो वा रसायन गळती, अशा घटना हाताळण्यासाठी तळोजा एमआयडीसीकडे आपत्कालीन आराखडा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपत्ती घडल्या तर नेमके करायचे काय? याचे नियोजनच नाही. एमआयडीसीमध्ये प्रत्येक प्लांटनुसार आराखडा तयार नाही. वायुगळतीसारखा प्रकार घडल्यास, आजूबाजूच्या ग्रामस्थांनी काय करायचे, याविषयी गेल्या अनेक वर्षात प्रशिक्षण एमआयडीसी व औद्योगिक सुरक्षा विभागाकडून देण्यात आली नाही. येथे अग्निशमन दल सोडले, तर जलद प्रतिसाद देणारी अशी कोणतीही टीम उपलब्ध नाही.

औद्योगिक सुरक्षा नियमावलीचे अनेक कंपन्यांकडून पालन केले जात नाही. सुरक्षा परीक्षण करण्याकरिता स्वतंत्र अशी टीम नाही. फॅक्टरी इन्स्पेक्टरने परिसरातील कंपन्यांची नियमित पाहणी करणे आवश्यक आहे, मात्र तसे होत नसल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरात वारंवार अपघाताच्या घटना घडत असून लाखो कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

खरंतर, एमआयडीसीतील प्रत्येक कारखान्यांमध्ये कोणते आणि किती उत्पादन केले जाते. त्यासाठी वापरण्यात येणारी घातक रसायने, वायू, तेल आदी सामग्री आदींची माहिती अग्निशमन दलाला वेळोवेळी देणे गरजेचे आहे, परंतु कंपन्यांकडून तसेच एमआयडीसीतील संबंधित अधिकार्‍यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे.

– आपत्ती व्यवस्थापनाचे सांगायचे झाले, तर आमच्याकडे फायर यंत्रणा आहे. त्या अग्निशमन दलात गाड्या व मनुष्यबळ आहे. आपत्ती आराखडासुद्धा तयार आहे. ज्या त्रुटी आहेत त्याची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. ज्यामुळे येथील सुरक्षा अबाधित राहु शकेल.

-दीपक बोबडे-पाटील, उपअभियंता तळोजा एमआयडीसी

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply