पनवेल : वार्ताहर
ढोलताशा पथकामध्ये काम देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने कळंबोली भागात राहणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची दिशाभूल करून त्याच्याजवळची 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेला 17 वर्षीय विद्यार्थी अविष्कार हा कळंबोली सेक्टर-1 भागात राहण्यास असून सध्या तो इयत्ता अकरावीत शिकत आहे. अविष्कार व त्याचे मित्र सेंट जोेसेफ स्कूलजवळ उभे असताना, त्या ठिकाणी आलेल्या स्वप्नील नावाच्या भामट्याने त्याचे जय अंबे ढोलताशा पथक असल्याचे, तसेच या पथकात मुले कमी असल्याने सदर ढोलताशा पथकात सहभागी होण्याबाबत विचारणा केली. या वेळी अविष्कार व त्याच्या मित्रांनी त्याला होकार दर्शविल्यानंतर भामट्या स्वप्नीलने कामोठे सेक्टर-6 मध्ये पालखीच्या कार्यक्रमात ढोलताशा वाजवायला जायचे असल्याचे सांगून त्यांना आपल्या सोबत कामोठेच्या दिशेने चालत नेले. काही अंतर गेल्यानंतर या भामट्याने अविष्कारच्या मित्रांना त्या ठिकाणी ढोलताशा पथकाची गाडी येणार असल्याचे सांगून सदर टेम्पोतून त्यांना येण्यास सांगितले. त्यानंतर स्वप्नीलने अविष्कार व त्याच्या मित्राला आपल्या सोबत पुढे नेले. काही अंतर गेल्यानंतर स्वप्नीलने अविष्कारच्या मित्राला थांबवून अविष्कारला सोबत नेले. त्यानंतर त्याने अविष्कारच्या गळ्यातील सोन्याच्या चेनमध्ये घरातील साईबाबाचे लॉकेट घालून आणण्याचा बहाणा करून त्याच्याजवळची सोन्याची चेन आपल्याजवळ घेऊन त्या ठिकाणावरून पोबारा केला. बर्याच वेळानंतर देखील स्वप्नील त्या ठिकाणी न परतल्याने अविष्कारने त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. तोपर्यंत याचे इतर मित्रदेखील त्या ठिकाणी आल्यानंतर स्वप्नीलने त्यांची फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अविष्कारने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आई-वडिलांना देऊन कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.