Breaking News

उद्धव ठाकरेंना शपथ घेण्यापासून रोखा

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई ः प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी (दि. 28) शिवाजी पार्कवर होणार आहे. दरम्यान, हा शपथविधी रोखण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने मात्र याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.

हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशी यांनी शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीविरोधात ही याचिका दाखल केली होती. याचिकेत त्यांनी निवडणूकपूर्व युती तोडून नव्या आघाडीचं सरकार बनवणं ही मतदारांची फसवणूक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शपथ घेण्यापासून रोखावं, अशी मागणी केली होती.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मंगळवारी झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राजभवनवर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply