कर्जत : बातमीदार
तालुक्यातील शासकीय कार्यालयांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या सर्व इमारतींवर प्लास्टिक आच्छादने टाकावी लागतात. त्यासाठी यावर्षी तब्बल 1800 चौरस मीटर प्लास्टिक कापड आणण्यात आले आहे. कर्जत तहसील कार्यालय परिसरातील सर्व इमारती ब्रिटिशकालीन असून, त्यांच्या छपराला छिद्रे पडली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असते. तहसील कार्यालयासह बाजूला असलेले सेतू कार्यालय, परिसरातील पोलीस ठाण्याची आरोपी कोठडी, सहनिबंधक कार्यालय, संजय गांधी निराधार योजना कार्यालय आणि रेकॉर्ड रूममधील कागदपत्रे भिजण्याची शक्यता लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून या सर्व कार्यालयांच्या इमारतींवर प्लास्टिक आच्छादन टाकण्यात येते. शासकीय कार्यालयातील कागदपत्रांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने कर्जत शहरातील दिवाणी न्यायालय, पोलीस कॉलनी, पोलीस निरीक्षकांचा बंगला, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयाची इमारत, तसेच कर्जत भिसेगाव आणि नेरळमधील महसूल खात्याची गोडाऊन, माथेरानमधील महसूल अधीक्षक कार्यालय, पोलीस ठाणे, पोलीस वसाहत या इमारतींचे छप्पर प्लास्टिक आच्छादन टाकून झाकण्यात आले आहे. या सर्व कार्यालयांच्या छपरावर आच्छादन टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्लास्टिक कापड दिले आहे. त्यासाठी तब्बल 1800 चौरस मीटर प्लास्टिक कापड लागले. हिवाळा सुरू झाल्यानंतर या सर्व इमारतींवरील प्लास्टिक पुन्हा काढण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ए. आर. चौधरी यांनी सांगितले. कर्जतमधील सर्व सरकारी कार्यालये एकाच इमारतीत यावीत, असा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभाग करीत होता. हे प्रशासकीय भवन शहरातील पोलीस ग्राऊंड परिसरात होऊ घातले आहे.
येथील पोलीस ग्राऊंड परिसरात एक इमारत उभारून तेथे कर्जतमधील सर्व शासकीय कार्यालये आणण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सरकारी कार्यालयांना प्लास्टिक आच्छादनाचे छप्पर टाकण्याची वेळ येणार नाही.
-अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत